ऊर्जा आणि वीजनिर्मितीसाठी पर्यावरणस्नेही पर्यायांचा शोध जगभर सुरू आहे. भारतातही असे अनेक प्रयोग होत आहेत. पंजाबमधील जालंधर जिल्हय़ातील जमेशर डेअरी कॉम्प्लेक्स या उद्योगाने गायी-म्हशींच्या शेणापासून वीज तयार करण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी जर्मनीमध्ये विकसित करण्यात आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. या प्रकल्पात विजेबरोबरच इंधन वायुचेही उत्पादन होणार असून या वायुचा उपयोग स्वयंपाक करण्यासाठी किंवा वाहने चालविण्यासाठीही होऊ शकेल, असे प्रतिपादन करण्यात आले आहे.
वास्तविक हा प्रकल्प अनेक वर्षांपूर्वीच सुरू होणार होता. तथापि, सरकारी लालफितशाहीमुळे त्याचे काम रखडलेले होते. प्रकल्पासाठी लागणाऱया जमिनीचे हस्तांतरणही लांबणीवर पडले होते. आता हे सर्व अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामधून एक मेगावॅट वीज तयार होणार आहे. प्रकल्पाकरिता कंपनी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे. जमशेर संकुलात 17 हजार दुभती जनावरे आहेत. त्यांचे शेण एक मेगावॅट वीजनिर्मितीसाठी पुरेसे आहे, असे प्रयोगांती दिसून आले आहे. शिवाय इतर पशुधन मालकांकडूनही शेण विकत घेण्यात येणार आहे. भविष्यकाळात या प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅटपर्यंत नेण्याची योजना आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आणि आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरल्यास देशात इतरत्रही त्याची पुनरावृत्ती होणे शक्मय आहे.