नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मोबाईल ऍप्सवरून तत्काळ कर्जाचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची व्यक्तीगत माहिती चोरण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस आले असून त्यांचा संबंध चीनशी असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. फसवणूक करणारी ही ऍप्स चीनी बनावटीची असून मोबाईल धारकांना या आमिषांना बळी पडू नये असे आवाहन सरकारच्या विविध विभागांकडून करण्यात आले आहे.
तत्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखाविणारी ही ऍप्स इच्छुकांची सर्व व्यक्तीगत माहिती कर्ज देण्यासाठी मागवितात. नंतर ही माहिती अन्य कंपन्यांना विकली जाते. तसेच कर्जही दिले जात नाही, अशा तक्रारी भारताच्या अनेक शहरांमधून गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध राज्यांच्या सायबर गुन्हा शाखांनी या ऍप्सचा तपास हाती घेतला आहे. त्यातून या ऍप्सचे चीन कनेक्शन उघड होत आहे. त्यामुळे हा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.