प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना विरुद्धच्या लढ्याचा एक भाग म्हणून भाजपचे नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांच्या पुढाकाराने तपोवन प्रभाग क्रमांक 69 मध्ये कम्युनिटी क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. प्रभागातील गरजू नागरिकांना या कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून मोफत औषधोपचार देण्यात येणार आहेत.
भारतीय जनता पार्टी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कम्युनिटी क्लिनिकचा हा उपक्रम साकारण्यात येत आहे. तसेच या उपक्रमाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव भाजपचे कोल्हापूर महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, योगदान फाऊंडेशनचे ही सहकार्य लाभत आहे, अशी माहिती नगरसेवक खाडे पाटील यांनी दिली.
नगरसेवक खाडे म्हणाले, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अथवा व्हायरल इन्फेक्शनचा त्रास झाल्यास संबंधित गरजू रुग्णांनी तातडीने आमच्याशी संपर्क साधावा. तपोवन प्रभागातील डॉ. पद्माकर सरोदे आणि डॉ. सौ. मीनाक्षी सरोदे यांच्या जुनी मोरे कॉलनी कॅनन ग्रुप शेजारी संभाजीनगर येथील ओम क्लिनिकमध्ये तपासणी आणि योग्य ती औषधे उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हे कम्युनिटी क्लिनिक सुरू राहील. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक खाडे पाटील यांच्यासह योगदान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अभिषेक साळुंखे यांनी केले आहे.