पोलीस विमान व रेल्वेचा रेकॉर्ड तपासणार आतापर्यंत 13 जणांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातून निजामुद्दीन येथे तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा गोवा पोलीस कसून शोध घेत आहेत. आतापर्यंत गोव्यात 13 जणांना ताब्यात घेतले असले तरी आणखीनही काहीजण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोवा पोलीस सध्या विमान तसेच रेल्वेचा रेकॉर्ड तपासत आहेत. या कालावधीत दिल्ली निजामुद्दीनहून गोव्यात कोणकोण आहेत त्याची माहिती रेकॉर्डवर मिळणार असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. निजामुद्दीनहून आलेल्या लोकांची कोणाला माहिती मिळाली असल्यास त्यांनी 112 किंवा 100 किंवा 104 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका मोठय़ाप्रमाणात वाढला असून गोव्यात त्याचा फैलाव होऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकाने पोलिसांना सहकार्य करणे काळाची गरज आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन भागात झालेल्या मुस्लिमांच्या तबलिगी जमात या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाच्या साथीचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला असून, साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा लवकरात लवकर शोध घ्या आणि त्यांचे विलगीकरण करा, असा आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना दिला आहे. त्यानुसार गोवा पोलिसांनी शोध मोहिमेला सुरुवात केली आहे. राज्यात ठिकठिकाणी असलेल्या मुस्लिम जमातीतील लोकांशी संपर्क करून तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांचा पोलीस कसून शोध घेत आहे.
बुधवारी रात्री उशिरा फोंडा पोलिसांनी केलेल्या कारवाईत सिल्वानगर फोंडा येथील फातिमा मदरसा येथे लपून बसलेल्या मूळ गुजरात येथील तबलिगी जमातच्या 9 संशयिताना ताब्यात घेऊन मये रेसिडेन्सी येथील कॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहेत. फोंडा पोलीस व मडगाव आरोग्य केंद्राच्या टिमने ही कारवाई केली आहे. डिचोली पोलिसांनी डिचोली येथे केलेल्या कारवाईत डिचोली मुस्लीमवाडा येथून तीघांजणांना तर गावकरवाडा येथून एकटय़ाला ताब्यात घेतले आहे. त्यांनाही मये येथील कॉरन्टाईन केंद्रात ठेवण्यात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाबद्दल बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी मोठा ताफा घेऊन गोव्याच्या विविध भागातील मशिदी व अन्यत्र ठिकाणी शोध घेतला. एकूण 46 तबलिगींना विलगीकरण विभागात ठेवले आहे. अजूनही काही तबलिगी गोव्यात असल्याचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी ही शोध मोहिम सुरूच ठेवली आहे.