सीईएन विभागात तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
केशवनगर, वडगाव येथे गॅरेज चालविणाऱया राजहंसगड येथील एका तरुणाच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये भामटय़ांनी परस्पर हडप केली आहे. रविवारी हा प्रकार घडला असून या संबंधी सीईएन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
सुरज अशोक थोरवत (वय 23) या मेकॅनिक तरुणाच्या मोबाईलवर रविवारी 12 जुलैच्या दुपारी 3 मॅसेज आले. प्रत्येक दहा हजार दोन वेळा व पाच हजार एकवेळा असे त्याच्या बँक खात्यातून 25 हजार रुपये काढण्यात आल्याचे मॅसेजवरुन त्याच्या लक्षात आले.
कॉर्पोरेशन बँकेच्या येळ्ळूर शाखेत त्याचे खाते आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुरजने बँक अधिकाऱयांशी संपर्क साधून आपले खाते बंद करण्यास सांगितले. त्यानंतर सीईएन पोलीस स्थानकात येवून या संबंधी तक्रार केली आहे. रविवारी एका दिवसांत 10 ते 12 बँक ग्राहकाच्या खात्यातून रक्कम हडप करण्यात आली आहे.