प्रतिनिधी / कोल्हापूर
फेरीवाला धोरण निश्चित करण्यासाठी शहरातील फेरीवाल्यांची नोंदणी सुरु आहे. नोंदणीसाठी आवश्यक असणाऱया कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी फेरीवाल्यानां मंगळवार 10 रोजी पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत कागदपत्रे सादर केली नाहीत तर बुधवार 11 रोजीपासून शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधत तीव्र स्वरुपात कारवाई करण्याची मोहित हाती घेणार असल्याचे महापालिका प्रशासनाने शनिवारी स्थायी समिती सभेत स्पष्ट केले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात झालेल्या स्थायी समिती सभेत सभापती शारंगधर देशमुख आणि सदस्या माधुरी लाड यांनी शहरातील बेवारस वाहने, बंदीस्त पार्कीगबाबत प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना प्रशासनाने 10 जानेवारीनंतर अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र स्वरुपात राबविणार असल्याचे सांगितले. बंदीस्त पार्कींग संदर्भात माहिती देण्यासाठी विभागीय कार्यालयांचे उपशहर अभियंता यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचा आदेश सभापती देशमुख यांनी दिला.
खरमाती प्रभागाताच टाकली जाते
प्रभागातील खरमाती प्रभागातच का टाकली जाते. शहरातील खरमाती टाकणेच्या जागा निश्चित कराव्यात, अशी सूचना सदस्या पूजा नाईकनवरे यांनी केली. यावर खरमाती टाकण्यासाठी जागा निश्चित केलेल्या आहेत. याबाबत सर्व उपशहर अभियंता यांना सूचना देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. तसेच दोन आठवडे झाले शहरातील मोकाट कुत्र्यांचा नागरीकांना मोठया प्रमाणात त्रास होत आहे. यावर कार्यवाही करावी अशी मागणी सदस्या नाईकनवरे यांनी केली. यावर दिवसाला 15 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. निर्बिजीकरणाचे आणखी एक जादा सेंटर सुरु करणार असल्याचे सांगण्यात आले.
वारसांना कामावर रुज करण्यास विलंब का होतो
प्रभागातील एखादा सफाई कर्मचारी मयत किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी वारसा कर्मचारी मिळणेसाठी 3ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे प्रभागात कर्मचारी कमी पडत आहेत. वारसांना कामावर रुजु करुन घेण्यास विलंब का लागतो असा प्रश्न सभापती देशमुख आणि सदस्या नाईकनवरे यांनी केला. यावर कर्मचारी सेवानिवृत्त होत असेल तर त्यास 3 महिने अगोदर वारसा नेमणूकीसंबंधी काय कागदपत्रे लागतात याबाबत कळविले जाते. अनु.जातीच्या प्रवर्गासाठी वारसाची नेमणूक देताना जातीचा दाखला सादर करण्याचा शासन निर्णय आहे. बहुतांश कर्मचाऱयांकडे जातीचा दाखला उपलब्ध नसल्याने तो सादर करण्यास विलंब होत आहे. ज्यांची कागदपत्रे जमा होतील त्यांच्या वारसांना दूसऱया दिवशी नेमणूकीसंबंधी प्रस्ताव सादर केला जात असल्याचे सांगण्यात आले.
संभाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाचे काम का सुरु नाही
छत्रपती संभाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाचे काम अद्याप का सुरु करण्यात आलेले नाही असा प्रश्न सदस्या दीपा मगदूम यांनी उपस्थित केला. यावर छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा गांधी यांच्या स्मारकाच्या सुशोभिकरणाची वर्क ऑर्डर देण्यात आली असुन, लवकरच काम सुरु करणेची कार्यवाही करणार आहे.
बांधकाम नियमात दुरुस्ती करा
मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटलचे पार्कींग खुले असल्याशिवाय बांधकाम परवानगी देवू नये, याबाबत बांधकाम नियमात दुरुस्ती करण्यात यावी, अशी सूचना राजाराम गायकवाड यांनी केली. यावर पुढील बैठकीला माहिती देवू असे सांगण्यात आले.