3 सामन्यांच्या मालिकेला गुवाहाटीत प्रारंभ
गुवाहाटी / वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघ आज (रविवार दि. 5) पाहुण्या श्रीलंकन संघाविरुद्ध येथे पहिली टी-20 लढत खेळेल, त्यावेळी पुनरागमनवीर जसप्रित बुमराहचे मुख्य आकर्षण केंद्र असणार आहे. या लढतीच्या निमित्ताने नव्या वर्षातील क्रिकेट हंगामाला सुरुवात होत असून 26 वर्षीय बुमराह चार महिन्यांच्या ब्रेकनंतर आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. सायंकाळी 7 वाजता या लढतीला प्रारंभ होईल.
बुमराह स्ट्रेस प्रॅक्चरमधून सावरत असताना बीसीसीआयने जणू त्याला तळहातावरील फोडीप्रमाणे जपले. अगदी तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यानंतरही गुजराततर्फे प्रथमश्रेणी क्रिकेट लढतीत न खेळण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि यासाठी थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनीच जातीने लक्ष घातले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर बराच भार त्याच्यावर असेल. त्यामुळे, ही दक्षता गांगुली यांनी घेणे पसंत केले होते.
2019 चे वर्ष वनडे क्रिकेटचे ठरले असेल तर 2020 चे यंदाचे वर्ष टी-20 चे असणार आहे. त्यामुळे, मुख्य खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असावेत, यावर मंडळाचा भर असणे साहजिक आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून त्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ साधारणपणे 15 टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 संघासाठी अनेक जागांवरील खेळाडू अद्याप निश्चित व्हायचे असून यंदाच्या आयपीएल स्पर्धेनंतरच संघाचे स्वरुप स्पष्ट होऊ शकेल, असे संकेत आहेत.
गुवाहाटी हे आसाममधील सर्वात मोठे शहर असून नागरिकत्व कायद्याविरोधात बराच निषेध व्यक्त होत राहिल्याने सातत्याने कर्फ्यू राहिला. त्यानंतर आता पूर्ववत स्थितीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु आहे. येथील या मालिकेतील पहिल्या लढतीत भारतीय संघ नवदीप सैनी व शार्दुल ठाकुरसारखे नवोदित निर्णायक षटकात दडपण हाताळत कसा मारा करतात, यावर लक्ष केंद्रित करुन असेल. मोहम्मद शमीला विश्रांती, दीपक चहर स्ट्रेस प्रॅक्चरमुळे बाहेर, भुवनेश्वर कुमार स्पोर्टस हर्नियामुळे बाहेर अशा पार्श्वभूमीवरही सैनी व शार्दुल यांच्यासाठी ही उत्तम संधी असणार आहे.
कुलदीप-चहल यांच्यात एकालाच संधी
वॉशिंग्टन सुंदर प्रगतीच्या वाटेवर असून कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांच्यापैकी एकालाच अंतिम संघात संधी मिळू शकते. शिवम दुबे उत्तम फटकेबाजी करु शकतो. पण, त्याच्या गोलंदाजीत सातत्याचा अभाव आहे. त्यामुळे, हार्दिक पंडय़ा पूर्ण तंदुरुस्त होईतोवरच त्याला संधी असेल.
ऋषभ पंतमध्ये सातत्याचा अभाव, ही भारतीय संघव्यवस्थापनासाठी सध्याची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. संजू सॅमसनला मागील सलग 6 टी-20 सामन्यांपासून राखीव खेळाडूतच बसावे लागले असून धोनी यात कुठेही चर्चेत नसल्याने आणखी संभ्रमावस्था आहे. बुमराहच्या साथीने शिखर धवनही येथे पुनरागमन करत आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो संघात परतत आहे. उपकर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली असल्याने केएल राहुलच्या साथीने धवन सलामीची जबाबदारी सांभाळेल व स्वतःला नव्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
लंकेला फलंदाजीची चिंता
दुसरीकडे, लंकन संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील टी-20 मालिकेत 0-3 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला असून त्यांची फलंदाजी कमकुवत राहिली आहे. हा संघ बऱयाच अंशी कुशल परेरावर अवलंबून असल्याचे अधोरेखित होत आले आहे. माजी लंकन कर्णधार अँजिलो मॅथ्यूजचे पुनरागमन त्यांच्या पथ्यावर पडणार का, हे देखील येथे स्पष्ट होईल. मॅथ्यूजने ऑगस्ट 2018 मध्ये आपली शेवटची टी-20 खेळली होती.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, जसप्रित बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, अविष्का फर्नांडो, दसून शनाका, कुशल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजया डीसिल्वा, इसुरु उदणा, भानुका राजपक्ष, ओशादा फर्नांडो, वणिंदू हसरंगा, लहिरु कुमारा, कुशल मेंडिस, लक्शन संदकन, कसून रजिथा.
सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.