दुपारपर्यत तिघांनाच लस, नोंदणी मात्र सुरू
प्रतिनिधी / कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये सध्या भारत बायोटेकच्या तिसऱया टप्यातील प्रायोगिक लसीकरण सुरू आहे. सुटीदिवशी रविवारी लसीकरण सुरू झाले, पण इंटरनेंट मिळत नसल्याने दुपारपर्यत स्वयंसेवकांना ही लस देण्यात अडथळे आले. दुपारपर्यत फक्त तिघांनाच ही लस देण्यात आली. पण लसिकरणासाठी स्वयंसेवकांची नोंदणी मात्र सुरूच राहिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटल, आयसीएमआर आणि क्रोम यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक कंपनीची चाचणी लस स्वयंसेवकांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये देण्यात आहे. मंगळवारी या लसिकरणाला सुरूवात झाली. गुरूवारी, 31 डिसेंबरपर्यत 1 हजार जणांना लसिकरणाचे उद्दिष्ट आहे. पहिल्या दिवशी 21 जणांना ही लस देण्यात आली, नोंदणीसाठी गेली चार दिवस स्वयंसेवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. लस टोचून घेणाऱयांची संख्याही वाढली आहे.
सीपीआर हॉस्पिटलच्या जुन्या इमारतीसमोर नोंदणीसाठी मंडप उभारला आहे. येथे स्वयंसेवकांची नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी संमतीपत्र घेताना स्वयंसेवकांचा मोबाईल क्रमांक, आधारकार्ड, छायाचित्र घेतले जात आहे. संमतीपत्र भरल्यानंतर ही माहिती ऑनलाईन भारत बायोटेक कंपनीला पाठवली जात आहे. तेथून संमती मिळताच स्वयंसेवकांना ही लस दिली जात आहे. यापुर्वी क्रोम कंपनीचे जिल्हÎात केलेल्या सर्वेक्षणातून 972 जणांची निवड प्रायोगिक चाचणीसाठी केली आहे.
सीपीआरमध्ये भारत बायोटेक कंपनीचे लसिकरण सेंटर आहे. या सेंटरमधून रविवारी त्यांच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क होत नव्हता. इंटरनेट मिळण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुपारपर्यत अवघ्या तिघांनाच चाचणी लस देण्यात आली. पण नोंदणीचे काम मात्र सुरू राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली.