प्रतिनिधी / खेड
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या विकी गोसावी उर्फ विकास संतराम गोसावी (२९) यांच्या येथील पोलिसांनी भरणे येथे मुसक्या आवळल्या. या फरारीच्या अटकेमुळे ६ गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्ह्यांवर प्रकाश पडणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
विकी गोसावी उर्फ विकास संतराम गोसावी हा २०१४ पासून फरार होता. सांगली पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, वर्षानुवर्षे पोलिसांना गुंगाराच देत होता. कुपवाड, कुपवाड एमआयडीसी, सांगली शहर, महात्मा गांधी पोलीस स्थानक, संजयनगर पोलीस स्थानक आदी पोलीस स्थानकात त्याच्यावर ६ मालमत्तेविषयांसह अन्य गुन्हे दाखल होते. या सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी सांगली पोलिसांनी जंगजंग पछाडले होते.
मात्र, सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात सांगली पोलिसांना अपयशच आले होते. हा फरारी गुन्हेगार भरणे येथे रहात असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई विनय पाटील यांनी शिताफीने त्याच्या मुसक्या आवळून सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या ताब्यात दिले.