पहाटेपासून भक्तांनी केला स्वहस्ते अभिषेक
प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा तालुक्यात विविध ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. तांबडीसुर्ल येथील कदंब कालीन प्राचिन शिवमंदिरासह तालुक्यातील अन्य महादेव मंदिरात अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. साकोर्डा तांबळी सुर्ल येथील प्राचिन महादेव मंदिरात स्वहस्ते अभिषेक करण्यासाठी राज्याच्या विविध भागातील भक्तगणांनी पहाटेपासून उपस्थित लावली होती. मात्र कोरोना महामारीमुळे भाविकांची फारशी गर्दी दिसून आली नाही. देवस्थान समितीने यंदा दुपारच्या वेळेत होणारा महाप्रसाद रद्द केला होता. अभिषेक करण्यासाठी मात्र सायंकाळपर्यंत भाविकांची रेलचेल सुरु होती. सायंकाळी 4 वा. प्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांचे शिष्य ब्रह्मय देवानंद सुर्लकर, कौशलराम जोशी या बाल किर्तनकारांची ‘शिव महिमा’ या विषयावर किर्तने झाली. त्यांना तबल्यावर रुद्राक्ष वझे, हार्मोनियमवर सुवासबुवा वझे तर चिपळीवर देवानंद सुर्लकर यांनी साथ केली. गोव्यातील अनेक मान्यवरांनी यावेळी देवदर्शन घेतले. कुळे येथील राक्षस मळीकेश्वर देवालयातही कोरोनासंबंधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन अभिषेक व अन्य धार्मिक विधी पार पडले. शिवाय तालुक्यातील अन्य भागातील महादेव मंदिरातही महाशिवरात्री उत्सव छोटय़ामोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात आला.