शॅडो कौन्सिलचा मडगाव नगराध्यक्षांवर ठपका, अर्जदारांसहित विचारला जाब
प्रतिनिधी /मडगाव
मडगावच्या शॅडो कौन्सिलने शुक्रवारी पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांची भेट घेऊन त्यांनी राजकीय आदेशांचे पालन करून पालिकेच्या महसुलाचे नुकसान केल्याचा आरोप केला. शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांच्या नेतृत्वाखाली तात्पुरत्या बॅनरच्या प्रदर्शनासाठी परवानगी मागणाऱया अनेक अर्जदारांनी नगराध्यक्षांची त्यांच्या कक्षामध्ये भेट घेतली व पालिकेच्या कर्मचाऱयांना बॅनरसंदर्भात कोणतेही अर्ज स्वीकारू नयेत अशा सूचना का दिल्या अशी विचारणा केली.
तात्पुरत्या बॅनरप्रकरणी नगराध्यक्ष पेरेरा यांची चूक पकडली गेली असता जिल्हाधिकाऱयांनी आदेश जारी केल्याचे सांगत आपल्या कृतीचा बचाव करण्याचा प्रयत्न नगराध्यक्षांनी केला, असा दावा कुतिन्हो यांनी केला आहे. जिल्हाधिकाऱयांनी कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत वा पालिकेला तात्पुरत्या परवानग्या देण्यापासून प्रतिबंधितही केलेले नाही. जिल्हाधिकाऱयांचे आदेश स्पष्ट आहेत. केवळ सरकारी मालमत्तेतील अनधिकृत राजकीय बॅनर्स हटवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत, असे कुतिन्हो यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले.
अ?Ÿड. सियोला वाझ यांनी आरोप केला की, नगराध्यक्ष जिल्हाधिकाऱयांचे कोणतेही अधिकृत आदेश पाळत नसून त्यांच्या राजकीय बॉसच्या अनधिकृत निर्देशांचे पालन करत आहेत. तात्पुरत्या बॅनरसाठी अर्ज केलेले लिंकन वाझ यांनी तक्रार मांडली की, राजकीय पक्षांचे अर्ज स्वीकारू नयेत अशा सूचना दिल्या जातात आणि त्यानंतर पालिका आमचे बॅनर काढून टाकते. यामुळे आम्हाला आर्थिक नुकसान होते. दुसरीकडे अनेक बॅनर्सना आवश्यक परवानगी नसतानाही विद्यमान आमदार आणि नगरसेवकांचे बॅनर्स-होर्डिंग्स न काढता ठेवली जातात, असा दावा वाझ यांनी केला.
मडगाव पालिकेचा 15 लाखांहून जास्त महसूल बुडाला : कुतिन्हो
नगराध्यक्षांच्या अनधिकृत कृतीमुळे पालिकेचा 15 लाखांपेक्षा जास्त महसूल बुडाला आहे. 5 वर्षांहून अधिक काळ पालिकेला तात्पुरत्या जाहिरातींद्वारे मिळू शकणाऱया महसुलाची व्याप्ती यासाठी विचारात घेतली आहे. सार्वजनिक तिजोरीचा महसूल बुडत असल्याने नगराधक्षांच्या गैरकारभाराविरुद्ध आवश्यक कारवाईची मागणी करणारी याचिका पालिका प्रशासन संचालकांसमोर दाखल करण्यास शॅडो कौन्सिल मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा कुतिन्हो यांनी दिला आहे.