प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि कुटुंबियांतर्फे आयोजित करण्यात येणारा श्रीमद् देवी भागवत सप्ताह 3 ते 10 जानेवारी या दरम्यान रामनाथ भवन, आडपई, दुर्भाट, फोंडा येथे मोठय़ा उत्साहाने साजरा होणार आहे.
प्रसिद्ध वेदमूर्ती गणेशशास्त्री साळस्कर (देवरूख, रत्नागिरी), नामवंत वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले (सातारा) आणि पुणे येथील रसाळ वाणीसाठी प्रसिद्ध असलेले ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत रामदासी हे यंदाच्या श्रीमद् देवी भागवत सप्ताहाचे प्रमुख आकर्षण असणार असून भाविकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.
सप्ताहाच्या काळात रोज सकाळी 8 ते दुपारी 1 या दरम्यान संहिता वाचन होणार असून वेदमूर्ती महेश कमलाकर हे संहितेचे वाचन करणार आहेत. दुपारी 11.30 ते 12 यादरम्यान सामूहिक नामस्मरण व वेदमूर्ती विवेक गोडबोले व वेदमूर्ती गणेश साळस्कर हे भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करतील.
त्यानंतर संध्याकाळी 5 ते रात्री 9 या दरम्यान पुण्याचे ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत रामदासी हे देवी भागवतवर आपल्या ओघवत्या वाणीने निरुपण करणार आहेत. महेश धामस्कर (संवादिनी) आणि रुद्राक्ष वझे (तबला) हे साथ संगत करतील. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून उपकृत करावे, असे श्रीपाद नाईक आणि कुटुंबियांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाविषयक सुधारित नियमांचे पालन करून हा श्रीमद् देवी भागवत सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.