दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही तापसी पन्नूच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत निर्माण होणाऱया एका थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. सामंथा सध्या दुबईत स्वतःच्या कामासह सुटीचाही आनंद घेत आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सामंथा अत्यंत उत्सुक असल्याचे समजते. तपासी पन्नूच्या प्रॉडक्शन कंपनीच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱया या चित्रपटाकरता तिचे नाव निश्चित झाल्याचे मानले जात आहे. हा एक महिलाकेंद्रीत चित्रपट असून यात सामंथा मुख्य भूमिका साकारणार आहे.
तापसीने जुलै महिन्यात स्वतःचे प्रॉडक्शन हाउस आउटसायडर्स फिल्म्सची घोषणा केली होती. निर्माती म्हणून तापसी स्पॅनिश थ्रिलर चित्रपट ‘ब्लर’चा हिंदी रिमेक आणणार आहे. या चित्रपटात सामंथाची वर्णी लागली आहे का हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फॅमिली मॅन 2 या वेबसीरिजमधील दमदार अभिनयाद्वारे सामंथाने देशभरात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सामंथाने अलिकडेच नागा चैतन्यकडून घटस्फोट घेतला आहे. सामंथा आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही लक्ष केंद्रीत करू पाहत आहे.