अहान शेट्टी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी आणि तारा सुतारिया यांच्या ‘तडफ ः ऍन इनक्रेडिबल लव्ह स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया यांनी स्वतःच सोशल मीडियावर एक पोस्ट करत दिली आहे.
एका अद्भूत प्रेमकहाणीची प्रतीक्षा करत आहे. ‘तडप’ मोठय़ा पडद्यावर 3 डिसेंबर 2021 रोजी झळकणार असल्याचे लुथरिया यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे एक पोस्टर प्रसारित करण्यात आले होते. त्यावेळी चित्रपट 24 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले गेले होते. पण सद्यस्थितीत चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा टाळण्यात आले आहे, कारण चित्रपटगृहांवरून अद्यापही अनिश्चिततेची स्थिती आहे.
‘तडप’ चित्रपटामधून अहान शेट्टीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण होणार आहे. तडप हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेला तेलगू चित्रपट ‘आरएक्स 100’चा हिंदी रिमेक आहे. तडपची निर्मिती साजिद नाडियावाला करत आहेत. या चित्रपटात अहान-तारासोबत सौरभ शुक्ला, कुमुद मिश्रा आणि सुमित गुलाटी हे कलाकार देखील दिसून येणार आहेत. पटकथा रजत अरोरा यांची असून प्रीतम यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.