नवी दिल्ली/प्रतिनिधी
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतलं असलं तरी पंजशीरवर ताबा मिळवता आलेला नाही. तालिबान आपले सरकार स्थापन करणार आहे तरी येणारा काळ त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. अहमद मसूद ने तालिबान्यांविरोधात बंड पुकारले असल्याने येत्या काळात अहमद मसूद त्यांना त्रास देत राहणार आहे. दरम्यान, अहमद मसूद ने तालिबानला मोठा धक्का दिला आहे.
बंडखोरांनी त्याच्याकडून परवाण आणि बागलाण हे दोन प्रांत हिसकावले असल्याची माहिती समोर येत आहे. तालिबानसोबतच्या या लढ्यात महिलाही सामील झाल्या आहेत. पंजशीरमध्ये अहमद मसूद आणि हकालपट्टी केलेले उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे लढाऊ तालिबानला कडवी झुंज देत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंजशीर परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. या लढाईत शेकडो तालिबान लढाऊ मारले गेले आहेत.