अनेक गावांमध्ये स्वयंप्रेरणेने बंद पाळून ‘त्या’ घटनेचा निषेध : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घालून महाआरती
वार्ताहर /सांबरा
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळूर येथे विटंबना आणि अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळय़ाचीही विटंबना केल्याने सर्वत्र तीव्र जनक्षोभ उसळत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातूनही या विकृत प्रवृत्तीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. गावोगावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात येत असून स्वयंप्रेरणेने बंद पाळून ‘त्या’ घटनेचा निषेध करण्यात येत आहे.
सांबऱयात दुग्धाभिषेक व कडकडीत बंद
सांबरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ शिवमूर्तीला शनिवारी सायंकाळी शिवप्रेमी नागरिक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाआरती म्हणण्यात आली. यावेळी बोलताना जि.पं. माजी सदस्य नागेश देसाई म्हणाले की, बेंगळूर येथे घडलेला प्रकार अतिशय निंदणीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कोणत्याही जातीसाठी व भाषेपुरता मर्यादित नव्हते. त्यांनी अखंड हिंदुस्थानसाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यामुळे ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना शासन झालेच पाहिजे.
यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई, इराप्पा जोई, काशिनाथ धर्मोजी, विक्रम सोनजी, भुजंग गिरमल, मारुती सोनजी, भुजंग धर्मोजी, शिवाजी जोगाणी, भरमा चिंगळी, अजय सुतार, मोहन हरजी, निखिल चिंगळी, दिपेश हवालदार, गोपी पालकर, उमेश चौगुलेंसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कडकडीत बंद पाळून निषेध
शनिवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आल्यानंतर एक दिवस स्वयंप्रेरणेने गावात कडकडीत बंद पाळण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार रविवार दि. 19 रोजी सांबरा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व भाषिकांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपापले व्यवहार दिवसभरासाठी बंद ठेवले. थोर राष्ट्रपुरुषांचा अवमान यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नसून असे निंद्य प्रकार करून सर्वांना वेठीस धरणाऱया विकृत प्रवृत्तीला वेळीच आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. बंदला सर्वभाषिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवून सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत असल्याचे दाखवून दिले आहे.
बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथेही बेंगळूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. रविवारी सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व संघटना, युवक मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने जमले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक घालून महाआरती म्हणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आम्ही हिंदू म्हणून आज अभिमानाने जगतो. त्यामुळे इतक्या खालच्या दर्जाचे कार्य करणाऱया नीच लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. हिंदूंच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका व यापुढे अशी कृत्ये अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचेही ठरविण्यात आले.