प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला : काकती येथे वाहनांच्या रांगा
वार्ताहर /काकती
येथील राष्ट्रीय महामार्गावर कारचा ताबा सुटल्याने अपघात होऊन वाहनाचे नुकसान झाले. कंटेनर चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात होण्याचा अनर्थ टळला.
येथील राष्ट्रीय महामार्ग मोटार बॉडी बिल्डर गॅरेजजवळ जियो मोबाईल दुकानसमोर रविवारी सायंकाळी 4.30 वाजता झालेल्या अपघातात कार (जीए 05 एफ 1400) दुभाजकावर आदळल्याने इंजिन व टाकी फुटून मोठे नुकसान झाले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरून कार बेळगावकडे जाताना चालकाने कंटेनरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना कार कंटेनरला घासून कार चालकाचा ताबा सुटला व कार नेमकी कंटेनरसमोर आडवी येऊन दुभाजकावर चढली. टायर फुटल्याने कार जागीच थांबली.
यावेळी कंटेनरचा वेग साधारण होता. कार कंटेनरच्या समोर आडवी येताच चालकाने कंटेनर जागीच थांबविला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
येथील राष्ट्रीय महामार्ग गॅरेजीस जवळ ट्रकला ऑईल सिर्व्हिसिंग करण्यासाठी ट्रक थांबवून ऑईल घालण्यात येते. या महामार्गावर ट्रक जागोजागी थांबत असल्याने अडथळा निर्माण होतो. परिणामी काही वेळा ओव्हरटेक घेताना नेहमी अपघात होत आहेत. मात्र काकती पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.