प्रतिनिधी/ पणजी
ताळगाव पंचायत पणजी महापालिकेत विसर्जन करण्याची योजना तयार केली जात असून पणजी महापालिकेच्या प्रभाग संख्येमध्ये 30 वरून 50 पर्यंत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे.
पणजी महापालिकेची मुदत येत्या मार्चच्या दुसऱया आठवडय़ात संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी राज्यातील सर्वच पालिकांच्या निवडणुकीबाबतचा कार्यक्रम तयार केला जाणार आहे व या सर्व निवडणुका एकाचवेळी घेण्यात येतील. पणजी महापालिका क्षेत्रातून यापूर्वी ताळगावला वगळले होते आणि ताळगाव ही स्वतंत्र पंचायत करण्यात आली होती. त्यासाठी बाबूश मोन्सेरात यांनी स्वतःच पुढाकार घेतला होता. मात्र आता त्यांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी स्वतःच ताळगावचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. पणजी महापालिकेची सदस्य संख्या 30 असून ताळगावचा समावेश महापालिकेत झाल्यास प्रभागांची संख्या 50 च्यावर जाण्याची शक्यता आहे. सरकारने यावर अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र पुढील आठवडय़ात त्यावर निर्णय घेतला जाणार आहे.