प्रतिनिधी/ काणकोण
चावडी-काणकोण येथील आठवडय़ाचा बाजार तब्बल 10 महिन्यांनी सुरू झाला आहे. या आठवडय़ाच्या बाजारात विशेषता हुबळी, बेळगाव, कारवार या भागांतील भाजीविक्रेते आणि अन्य व्यावसायिक येत होते. मात्र कोविड-19 चा फैलाव टाळण्यासाठी काणकोणच्या जागरूक नागरिकांनी 15 मार्च रोजी आठवडय़ाच्या बाजारावर बंदी घालण्याची मागणी केली होती. तेव्हापासून आठवडय़ाचा बाजार पूर्णपणे बंद होता.
काणकोण पालिका मंडळाने देखील सावधगिरीचा उपाय म्हणून आठवडय़ाच्या बाजारात भाग घेणाऱया विक्रेत्यांना सूचना दिल्या होत्या. सध्या कोविडचे प्रमाण हळूहळू नियंत्रणाखाली आलेले आहे. त्यातच आज 10 रोजी चावडीवरील सेंट तेरेझा चर्चचे फेस्त असून त्याचा आधार धरून चावडीवरील आठवडय़ाचा बाजार पुन्हा सुरू झाला आहे. या बाजारात भाज्या आणि अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.