प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील रेल्वे फाटकांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या निवारण्यासाठी तिसरे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करून रस्ता खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असून खांबांवर ट्रॉझल बिम घालण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
शहरांतर्गत रस्त्यांवर 12 ठिकाणी रेल्वे फाटक असून यापैकी 7 फाटक हटवून नवीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय रेल्वे खात्याने घेतला आहे. याकरिता केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी पहिले रेल्वे उड्डाणपूल कपिलेश्वर रोड येथे उभारण्यात आले असून दुसरे उड्डाणपूल जुना धारवाड रोड येथे उभारण्यात आले आहे. याअंतर्गत ब्रिटिशकालीन ओव्हरब्रिज हटवून गोगटे चौक परिसरात नवीन उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. आता तिसऱया रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. रस्त्यांवर होणारी वाहनांची वर्दळ आणि येथील अडचणीचा विचार करून डिसेंबरपूर्वी तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून उभारणीचे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. पण कोरोनामुळे काम बंद ठेवण्यात आल्याने नऊ महिन्यांपासून काम रखडले आहे. सध्या कुशल कामगार नसल्याने उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कामगारांकरवी हे काम सुरू आहे.
यानंतर प्रत्येक खांबावर ट्रॉझल बिम घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ट्रॉझल बिम घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गर्डर ठेवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गर्डर तयार करण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. अनगोळ नाका ते तिसरे रेल्वेगेट रस्त्यावर गर्डर तयार करून ठेवण्यात आले आहेत. गर्डर बसवून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. पण कामाची गती पाहता डिसेंबरपर्यंत केवळ एका बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.