मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : विशेषज्ञांच्यामते तिसरी लाट असणार अधिक तीव्र,17 वर्षांखालील मुलांना जपण्याची गरज
प्रतिनिधी / पणजी
केवळ एका महिन्यातच हजारभर लोकांचे बळी घेणाऱया कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या कहरानंतर आता खास करून 17 वर्षांखालील मुलांवर हल्ला करणारी महाभयानक तिसरी लाट येणार असल्याचे अंदाज विशेषज्ञ वर्तवित असतानाच या लाटेने यापूर्वीच तब्बल 16246 मुलांच्या गळ्याभोवती विषारी विळखा टाकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी राज्यातील एकूण बाधितांच्या संख्येच्या 11.34 टक्के एवढी आहे. त्याही पुढे जाताना या बाधितांमधील को मोर्बिड स्थितीतील 7 मुलांचा मृत्यूही झाला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी आल्तिनो येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची उपस्थिती होती.
दहा जूनपूर्वी सर्वदृष्टय़ा सक्षम बनणार
कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम असतानाच आता तिसऱया लाटेचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट विशेषतः मुलांवर जास्त परिणाम करणारी ठरणार असल्याचे विशेषज्ञ सांगत आहेत. या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने जोरदार तयारी सुरू केली असून 5 ते 10 जून पूर्वी आम्ही त्यासाठी सर्वदृष्टय़ा सक्षम बनणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बालरोगतज्ञ डॉक्टरांचीही समिती स्थापन
राज्यात 17 वर्षे वयोगटातील सुमारे 4.5 लाख मुले आहेत. त्यात 12 वर्षांखालील मुलांची संख्या 3.2 लाख आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेतून अनुभव घेत सरकारने खास कृती दल तसेच तज्ञ बालरोगतज्ञ असलेल्या डॉक्टरांचीही समिती स्थापन केली आहे.
एनआयसीयू खाटांची संख्या वाढविणार
त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार अत्यावश्यक साधनसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यात प्रामुख्याने गोमेकॉत खास मुलांसाठी 10 एनआयसीयू, उत्तर गोवा इस्पितळात 5 एनआयसीयू, त्याचबरोबर सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये खास मुलांसाठी आयसीयुतील खाटांची संख्या 60 पर्यंत वाढविण्यात येणार आहेत.
विद्यमान खाटांचाही होऊ शकतो वापर
याशिवाय विद्यमान आयसीयू खाटांमधील 20 टक्के खाटा कोणत्याही क्षणी मुलांच्या आयसीयुसाठी वापरात आणण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. या सर्वांच्या बरोबरीने अत्यावश्यक असलेली औषधे, उपकरणे आणि मनुष्यबळ यांवरही भर देण्यात येणार आहे.
राज्यातील 120 बालरोगतज्ञांची मदत घेणार
राज्यात सरकारी आणि खाजगी मिळून सुमारे 120 बालरोगतज्ञ आहेत. गरजेनुसार त्या सर्वांचीही सेवा घेण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास सध्याची कोविड इस्पितळे मुलांच्या इस्पितळात बदलण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. तेथे लागणारी सर्व उपकरणे व औषधे खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
सरकारी, खाजगी क्षेत्रात समान एसओपी
कोविड 19 च्या व्यवस्थापनासाठी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातही समान एसओपी असावी असे यासाठी एम्सच्या मदतीने डॉक्टर्स, नर्स आणि अन्य सर्व संबंधितांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
समुपदेशनासाठी मनुष्यबळ प्रशिक्षित करणार
तिसऱया लाटेत बाधित मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे काही समुपदेशकांनाही प्रशिक्षित करण्यात येत आहे. संसर्ग रोखण्यासाठी गृहविलगीकरण आणि देखरेख यावर सरकार कठोर लक्ष ठेवणार आहे.
दोन वर्षांखालील मुलांच्या मातांच्या लसीकरणास प्राधान्य
दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या 18 ते 44 वर्षे वयोगटातील मातांना लसीकरणात प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वीप्रमाणे ऑनलाईन नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. लसीकरण केंद्रावरच त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र सध्या सरकारकडे लसी कमी असल्यामुळे ती पद्धती सुरू करण्यात आलेली नाही. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात लसींचा दुसरा कोटा उपलब्ध होणार असून त्यानंतर ती पद्धती सुरू करण्यात येणार आहे.
लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
सध्या सुमारे 2.80 लाख डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे टीका उत्सव प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 168 केंद्रे होती त्यात आता 20 ते 25 केंद्रांची भर घालण्यात येणार आहे. हा उत्सव केवळ पहिल्या डोससाठी असेल. दुसऱया डोससाठी 84 दिवसाचे अंतर पाळावे लागणार आहे. 45 वर्षे वयोगटावरील सर्वांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. पुढील आठ दिवसात ते पूर्ण करणे शक्य झाल्यास त्यापुढील लक्ष्य हे 18 ते 44 वयोगटावर केंद्रीत करणे शक्य होणार आहे. त्यासाठी पंचसदस्यापासून आमदारापर्यंत सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
550 खाटांच्या क्षमतेचा सुपर स्पेशालिटी ब्लॉक यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला असून तेथे उपलब्ध 394 पैकी 284 खाटा वापरात आणलेल्या आहेत. गोमेकॉतून स्थलांतर करणे शक्य असलेल्या सर्व रुग्णांना सुपर स्पेशालिटीमध्ये आणण्यात येईल. त्यामुळे यापुढे कोणत्याही रुग्णास खाट उपलब्ध नाही, असा प्रकार घडणार नाही. त्याशिवाय तेथे तिसऱया लाटेच्या संभाव्य धोक्याचीही तयारी ठेवण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ऑक्सिजन, औषधांचा पुरेपूर साठा : गोवा सरकारची न्यायालयाला माहिती सादर
कोरोनासाठी दिले जाणारे टार्गोसीड-400 औषध आणि ऑक्सिजनचा भरपूर साठा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) असून तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज केली जात असल्याचे लेखी उत्तर गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले आहे.
गोवा वेद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात कोरोनाचे जे रुग्ण दगावतात ते ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे नाही. गोव्याला 26 मेट्रिक टन ऑक्सिजन कोटा मिळत होता, आता 46 मेट्रिक टन मिळत आहे. गोमेकॉत 20 मेट्रिक टन ऑक्सिजनची टाकी कार्यान्वीत करण्यात आली आहे. आता गोव्यात ऑक्सिजनचा बफर स्टॉकही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तातडीने करणार कर्मचारी भरती
सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये 350 रुग्णांना स्थलांतर करण्यात आले आहे. लगेच एस.एस.बी विभाग पूर्णपणे सुरु केला जाईल, त्यासाठी तातडीने अतिरिक्त परिचारिका आणि कर्मचारीवर्गाची भरती केली जाणार असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे.
रोज होतात चार हजारांवर चाचण्या
कोरोना चाचण्या घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासाठी गोमेकॉत आर.टी.पी.सी.आर यंत्र बसवण्यात आले आहे. उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात अशाच प्रकारची यंत्रे देण्यात आली आहेत. प्रत्येक यंत्राची क्षमता रोज 900 चाचण्या घेण्याची आहे. दिवसाला फक्त 1612 एवढय़ाच चाचण्या होत होत्या. आता रोज 4312 चाचण्या घेतल्या जातात अशी माहिती देण्यात आली आहे. चाचण्यांचा अहवाल 36 तासांच्या आत उघड केला जातो असे नमूद करण्यात आले असून 36 तासांपेक्षा अधिक काळ लागता कामा नये, असे उच्च न्यायालयाने अंतरिम निवाडय़ात स्पष्ट करण्यात आले आहे.
तिसऱया लाटेची तयारी ठेवा
गोव्यात सर्वकाही चांगलेच होईल, अशी सकारात्मक अपेक्षा नहेमी ठेवता येते. मात्र मागील काही दिवसांचा अनुभव पहाता वाईटातील वाईट परिस्थिती आल्यास काय करता येईल, याची तयारी सरकारने घ्यावी. मागच्या अनुभवातून बोध घेऊन तिसऱया लाटेसाठी सज्ज रहावे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.