प्रतिनिधी/ कराड
रूग्ण घेऊन कराडला दवाखान्यात निघालेल्या भरधाव जीपची छोटाहत्ती टेंपोसह दुचाकीला पाठीमागून धडक बसल्याची घटना सोमवारी घडली. या तिहेरी अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून टेंपोचालकासह जीपचालक गंभीर जखमी झाले आहेत.
आशियाई मार्गावर पंकज हॉटेलसमोर सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. शिवम उर्फ विशाल निवृती यादव (वय 35, सध्या रा. मुंढे ता कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नावे आहे. अपघातात जीप चालक गणेश सुरेश यलार ( वय 40 रा, काशिळ), टेंपो चालक सुशिल संतोष गायकवाड ( रा. शेणोली ता. कराड) हे जखमी झाले आहेत
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गणेश यलार हे बोलेरो जीप काशिळ येथून गंभीर रूग्ण घेऊन कराडमधील रूग्णालयात जात होते. महामार्गावरून येत असताना येथील पंकज हॉटेल समोर आले असता लाकडे भरून कराडमधेच जात असलेल्या छोटाहत्ती टेम्पोला जीपने पाठिमागून भरधाव वेगात धडक दिली. या धडकेत टेंपो महामार्गावरच पलटी झाला. नेमके त्याचवेळी कराडकडे निघालेल्या दुचाकी क्रमांकला दोन्हीही वाहनांची धडक झाली.
या तिहेरी अपघातात दुचाकीस्वारासह तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, चंद्रकांत जवळगेकर, सुदेश दोरा, धनंजय घारे यांच्यासह कराड शहर पोलिस ठाण्याचे खलिल इनामदार त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. जखमींना मदत करून घटनेचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहना बाजूला करून महामार्ग वाहतूकीस खुला केला.