वृत्तसंस्था/ माद्रीद
कॅनडाची सहावी मानांकित महिला टेनिसपटू बियान्का अँड्रेस्क्यूला कोरोना बाधा झाली असल्याने तिने माद्रीद येथे होणाऱया महिलांच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे.
येत्या शुक्रवारपासून माद्रीद टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी अँड्रेस्क्यू माद्रीदमध्ये दाखल झाली होती. पण माद्रीदला प्रयाण करण्यापूर्वी अँड्रेस्क्यूची दोनवेळा कोरोना चाचणी घेण्यात आली होती आणि त्यामध्ये ती निगेटिव्ह असल्याचे आढळून आले पण त्यानंतर माद्रीदमध्ये कोरोना चाचणी घेतली असताना ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. 2019 साली अँड्रेस्क्यूने पहिल्यांदा अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. माद्रीद टेनिस स्पर्धेत खेळता येत नसल्याबद्दल अँड्रेस्क्यूने निराशा व्यक्त केली. तिला काही दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे.