प्रतिनिधी /बेळगाव
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 11 जणांचा अद्याप शोध लागला नाही. पोलिसांनी पुन्हा त्यांचा तपास सुरू केला असून त्यांचा ठावठिकाणा माहिती असल्यास नागरिकांनी माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आश्रय कॉलनी-रुक्मिणीनगर येथील श्रीराम माधवराव होन्नावरकर (वय 59)हे गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता आहेत. तर मूळचे हडलसंग (ता. इंडी, जि. विजापूर) व सध्या आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर येथील आण्णाप्पा इराप्पा कट्टीमनी (वय 45) हा इसम 20 सप्टेंबर 2017 पासून बेपत्ता झाला
आहे.
अशोकनगर येथील मुबारक शब्बीर अहम्मद दोडमनी (वय 37) हा युवक 5 ऑक्टोबर 2017 पासून बेपत्ता आहे. मोटारसायकल आणण्यासाठी गोकाकला जाण्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. आश्रय कॉलनी-रुक्मिणीनगर येथील गीता सुरेश नाचेरी उर्फ कोंचीकोरवर (वय 45) ही महिला 11 फेब्रुवारी 2018 पासून बेपत्ता आहे. स्टेशनरी साहित्य विकण्यासाठी म्हणून ती आपल्या घराबाहेर पडली होती.
मूळचा महाद्वार रोड व सध्या सुभाष गल्ली-गांधीनगर येथे राहणारा श्रीधर महावीर मुतगी (वय 38) हा युवक 9 फेब्रुवारी 2018 पासून बेपत्ता आहे. मूळचा फुलबाग गल्ली व सध्या रामतीर्थनगर येथील मल्लिकार्जुन इराप्पा मेलमट्टी (वय 38) हा युवक 26 मार्च 2017 पासून बेपत्ता आहे. ‘पुण्याला जातो’ असे सांगून तो घराबाहेर पडला होता.
नेगिनहाळ (ता. बैलहोंगल) येथील मडिवाळाप्पा नागाप्पा तपरी (वय 45) हा अय्याप्पा स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून गेला होता. तो अद्याप घरी परतला नाही. अंजनेयनगर येथील वीरसंगाप्पा राचाप्पा चिनीवालर (वय 73) हा वृद्ध 5 डिसेंबर 2019 पासून बेपत्ता आहे. गँगवाडी येथील दत्ता गोपाळ पाटील (वय 65) हा वृद्ध 1995 ऑक्टोबरपासून बेपत्ता आहे. मात्र 7 मार्च 2017 रोजी कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केली आहे.
हुडको कॉलनी-अशोकनगर येथील इरशाद गौसमैयुद्दीन मुजावर (वय 40) हा 24 मे 2019 पासून बेपत्ता आहे. तापरा (जि. बाडमेर, राजस्थान) येथील महेंद्रसिंग रजपूत (वय 27) हा तरुण 16 ऑक्टोबर 2017 रोजी बेळगाव येथून बेपत्ता झाला आहे. कपडे विक्री व्यवहारातून पैसे वसुलीसाठी तो बेळगावला आला होता. या अकरा जणांविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405251 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.