कोकण रेल्वे समन्वयक समितीला रेल्वे प्रशासनाचे पत्र, आंदोलनाचा दिला होता इशारा
प्रतिनिधी / खेड
कोकण मार्गावरून धावणाऱ्या दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस ही कोरोना विशेष गाडी मडगावपर्यंत नेण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर कोकण रेल्वे समन्वयक समितीने विरोध दर्शविला. हा प्रस्ताव तात्काळ रद्द न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर तुतारी कोरोना विशेष गाडी मडगावपर्यंत नेण्याचा कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे पत्र शुक्रवारी कोकण रेल्वे समन्वयक समितीला दिले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या २२ मार्चपासून ठप्प होत्या. कोकणातील प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर २६ सप्टेंबरपासून दादर-सावंतवाडी तुतारी कोरोना विशेष गाडी चालवण्यास सुरुवात केली. या एक्सप्रेसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी ही एक्सप्रेस मडगावपर्यंत नेण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावास कोकण रेल्वे समन्वयक समितीने विरोध दर्शवत हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. तसे पत्रही रेल्वे प्रशासनास सादर केले होते. या एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्यांना प्रतिसाद मिळत नसला तरी उर्वरित डब्यातील प्रवाशी संख्या क्षमतेच्या ८० ते ९५ टक्के असल्याची बाबही निदर्शनास आणून देत एसी डबे कमी करून अतिरिक्त डबे देण्याचीही मागणी केली होती. मात्र, ही एक्सप्रेस मडगावपर्यंत नेण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केल्याने साऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.