प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरात सोमवारपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाल्याने बाजारात तुळशीच्या लग्नासाठी लागणाऱया साहित्याची रेलचेल सुरू आहे. याबरोबरच ठिकठिकाणी उसाची विक्रीदेखील सुरू झाली आहे.
कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. सोमवारपासून प्रारंभ होणारा हा विवाह सोहळा शुक्रवार दि. 19 रोजी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. याकरिता बाजारात ऊस, हिरवा चुडा, चिंचा, आवळे, विविध फळांसह तुळशी पूजनाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. या खरेदीसाठीही नागरिकांची वर्दळ वाढली आहे. बाजारात विविध फळांना मागणी वाढली आहे. पाच फळे 60 ते 70 रुपयाला आणि तुळशी पूजनाचे साहित्य 20 रुपयाला विक्री होत आहे. शहरातील काकतीवेस, यंदेखूट, समादेवी गल्ली व इतर ठिकाणी उसाची विक्री होत होती. साधारण 70 ते 80 रुपयाला 5 ऊस याप्रमाणे विक्री सुरू होती.