भाजप खासदार अर्जुन सिंग यांचा दावा : ज्येष्ठ नेते सौगत राय यांच्या नावाचा उल्लेख
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे, परंतु राजकीय उलथापालथ आताच सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे शुभेंदु अधिकारी हे भाजपच्या वाटेवर असताना नवी माहिती समोर आली आहे. तृणमूलचे वरिष्ठ खासदार सौगत राय यांच्यासह 5 खासदार लवकरच भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावा भाजप नेते अर्जुन सिंग यांनी केला आहे.
दमदमचे खासदार सौगत राय हे 4 अन्य खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सिंग यांनी म्हटले आहे. राय हे लोकसभेचे खासदार असून मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषविले आहे. सौगत राय हे चौथ्यांदा खासदार झाले असून यापूर्वी ते 5 वेळा आमदार राहिले आहेत.
उत्तर 24 परगणा जिल्हय़ातील छठ पूजेत सामील होताना अर्जुन सिंग यांनी यासंबंधीचा दावा केला आहे. तृणमूलचे 5 खासदार कधीही राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होऊ शकतात. शुभेंदु अधिकारी जनतेचे मोठे पाठबळ असणारे नेते आहेत. अधिकारी आणि त्यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी संघर्ष केल्यानेच ममतांना मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचता आले आहे. परंतु ममता बॅनर्जी या सर्वांचा त्याग विसरून स्वतःच्या भाच्याला मोठं करू पाहत आहेत. झालेला अपमान पाहता शुभेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँगेसला रामराम ठोकावा, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.
शुभेंदु अधिकारी यांच्या सहकाऱयांना खोटय़ा गुन्हय़ांमध्ये अडकविले जात आहे. मलाही अनेकदा त्रास देण्यात आला आहे. परंतु मोठय़ा नेत्यांना रोखले जाऊ शकत नाही हे त्यांनी जाणून घ्यावे. शुभेंदु मोठे नेते असून भाजपमध्ये त्यांचे नेहमीच स्वागत असेल. भाजप पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापन करणार आहे. शुभेंदु यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच ममता सरकार राज्यात टिकू शकणार नाही असे उद्गार अर्जुन सिंग यांनी काढले आहेत.