जिल यांच्या धोरणात्मक सल्लागारपदी माला अडिगा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्हाइट हाउससाठी काही नव्या नियुक्त्या केल्या आहेत. भारतीय वंशाच्या अमेरिकन माला अडिगा यांना नियोजित अध्यक्षांच्या पत्नी जिल बायडेन यांच्या धोरणात्मक सल्लागार पदी नियुक्ती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे माला या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यासोबत कार्यरत होत्या. निवडणुकीदरम्यान माला यांनी प्रचारमोहिमेच्या सल्लागार म्हणून काम पाहिले होते. माला या अकॅडमिक स्ट्रटजिस्ट आहेत. याचबरोबर त्यांना विदेश धोरणासंबंधी प्राविण्य प्राप्त आहे. बराक ओबामांच्या दुसऱया कार्यकाळात माला यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.
व्हाइट हाउसमध्ये दाखल झाल्यावर म्हणजेच प्रथम महिला झाल्यावरही प्राध्यापिका म्हणून काम करत राहणार असल्याचे जिल बायडेन यांनी स्पष्ट पेले आहे.
ओबामांच्या काळातही पद
2008 मध्ये बराक ओबामांच्या प्रशासनातही माला कार्यरत होत्या. त्या दरम्यान त्या शिक्षण सचिव होत्या. याचबरोबर स्टेट डिपार्टमेंट म्हणजेच विदेश विभागातही त्यांनी काम केले आहे. महिलांशी संबंधित जागतिक समितीतही माला यांची महत्त्वाची भूमिका होती.
नॅशनल सिक्युरिटीत मानवाधिकार विभागाचेही त्यांनी नेतृत्व केले आहे. इलिनोइस येथे वास्तव्य असलेल्या माला यांना मिनेसोटा कॉलेजमधून सार्वजनिक आरोग्य तर शिकागो लॉ स्कुलमधून मानवाधिकारसंबंधित पदवी प्राप्त आहे.
नव्या नियुक्त्या होणार बायडेन यांची ट्रान्झिशन टीम लवकरच काही आणखीन नियुक्त्यांची घोषणा करणार असल्याचे मानले जात आहे. सोमवार किंवा मंगळवारी चार ते पाच नियुक्त्यांची घोषणा केली जाऊ शकते. यातही भारतीय वंशाचे काही अधिकारी असू शकतात. डॉ. विवेक मूर्ती यांना बायडेन यांचा आरोग्य विषयक सल्लागार नेमले जाऊ शकते. याचबरोबर ते संघीय आरोग्य सचिवही होऊ शकतात.