सरकारने खरेदीच्या दिशेने टाकले पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वायुदलासाठी 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निर्णयानंतर भारत सरकार आता मिग-29 आणि सुखोई-30च्या खरेदीच्या दिशेने अधिकृत स्वरुपात पावले टाकत आहे. यापूर्वी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळाच्या समितीने स्वदेशी तेजस विमानाच्या खरेदीच्या 48,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराला मंजुरी दिली होती. सरकारकडून आता लवकरात लवकर 21 मिग-29 विमानांसाठी प्रस्ताव मांडला जाणार आहे.
हा प्रस्ताव रशियाची सरकारी कंपनी रोसबोनएक्सपोर्टसमोर मांडला जाईल. नव्या मिग-29 विमानांना पूर्वीच्या तुलनेत कमी किमतीत खरेदी केले जाणार आहे. भारतीय वायुदलात मिग विमानांची संख्या यामुळे वाढून 59 होणार आहे. वायुदलात आतापर्यंत 268 सुखोई विमानांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सुखोईच्या निर्मितीचा परवाना हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडे आहे.
42 स्क्वॉड्रन्सची आवश्यकता
वायुदलातून मिग-21, मिग-23 आणि मिग-27 निवृत्त झाल्यावर स्क्वॉड्रन्सची संख्या कमी होत 30 राहणार आहे. 2024 पर्यंत उर्वरित 4 मिग-21 विमाने बायसन्स स्क्वॉड्रनमधून बाहेर पडतील. तर चीन आणि पाकिस्तानच्या धोक्याला हाताळण्यासाठी किमान 42 स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये 16-18 लढाऊ विमाने आहेत. जानेवारी 2024 पासून डिसेंबर 2028 पर्यंत 83 नवी तेजस विमाने दाखल झाल्यावर वायुदलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे.
जुलैमध्येच मंजुरी
मागील वर्षी जुलैमध्ये संरक्षण मंत्रालयाने 21 एविएनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सुइट्ससह 21 मिग-29 विमानांच्या खरेदीसाठी प्रारंभिक मंजुरी दिली होती. याचबरोबर 59 विद्यमान लढाऊ विमानांच्या अद्ययावतीकरणाचा मुद्दा यात सामील होता. तर 10,730 कोटी रुपयांच्या खर्चातून 12 नवी ट्विन-सीट सुखोई खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. यात ऍडव्हान्स इलेक्ट्रॉनिक युद्धक्षमतेसह सुटेभागही सामील होते.