आंतरजातीय प्रेमसंबंधातून २० वर्षीय युवकाची हत्या
वार्ताहर / आवळी बुद्रुक,
पिंपरी चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथे आंतरजातीय प्रेमसंबंधामुळे २० वर्षीय विराज भालचंद्र जगताप या युवकाची हत्या करण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या दिवसाढवळ्या हत्या होणे म्हणजे पुरोगामी विचारांची हत्याच म्हणावी लागेल. असे कृत्य करणाऱ्या गुंडांना तात्काळ गुन्हा नोंद करुन अटक करावी, मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे.आंतरजातीय प्रेम प्रकरणातून गावगुंडांनी हत्या घडवून आणली या क्रूरकर्म गावगुंडांना कडक शासन करावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप कांबळे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मीना निंबाळकर यांच्याकडे केली.
निवेदनात हल्ला ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत, मयत विराज जगताप खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत पिडीत कुटूंबाला देण्यात यावी, आरोपींना कडक शिक्षा करावी अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे पाठवल्या आहेत.