पाटील दामपत्याने जागवली माणुसकी
सरवडे प्रतिनिधी
दुचाकीवरून लेकीच्या गावी यात्रेसाठी चाललेल्या दारवाड ता. भुदरगड येथील वृद्धाचा उंदरवाडी – सरवडे मार्गावर दुचाकी घसरून अपघात झाला. डोक्याला खोलवर जखम झाल्याने वृद्धाचे कपडे रक्ताने माखून निघाले. या रस्त्यावरुन गारगोटीला कारमधून जाणाऱ्या एका दांपत्याने अपघाताचे दृश्य पाहून कार मागे परतून या वृद्धाला तातडीने सरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याची समय सूचकता दाखविली. तसेच वृद्धाची गंभीर अवस्था पाहून 108 रुग्णवाहिके साठी ही वर्दी दिली. प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीचे प्रथमोपचार आणि लगेच 108 मधून सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल झाल्याने या वृद्धाचे प्राण वाचले.
दारवाड ता. भुदरगड येथील ज्ञानदेव महाजन हे वृद्ध गृहस्थ आपले शेजारी रंगराव महादेव सुतार यांच्या दुचाकीवरून सावर्डे पाटणकर ता. राधानगरी येथे आपल्या मुलीकडे यात्रेला चालले होते.
उंदरवाडी ओढ्या जवळील उतारावर सुतार यांचा दुचाकी वरील ताबा सुटला आणि दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर आपटले. त्यामध्ये सुतार यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली मात्र महाजन यांच्या डोक्याला खोल जखम होऊन जोराचा रक्तस्त्राव सुरू झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी स्वारांनी दोघाही जखमींना रस्त्याकडेला घेतले.
एवढ्यात आपल्या कार मधून सपत्नीक गारगोटीला चाललेले गोकुळचे अधिकारी आशिष पाटील यांनी अपघाताचे दृश्य आणि जखमींची अवस्था पाहून कार मागे घेतली आणि जखमींना कार मधून तातडीने प्रथमोपचारासाठी सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तर 108 ॲम्बुलन्सलाही वर्दी दिली.सरवडे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटील यांनी त्वरित दोन्ही जखमींवर उपचार केले. मात्र महाजन यांचा रक्तस्त्राव आणि जखमेची स्वरुप पाहून त्यांना सीपीआरकडे रवाना केले.
दरम्यानच्या काळात पाटील दाम्पत्यांने जखमी महाजन व सुतार यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून त्यांना अपघाताची कल्पना दिली. महाजन यांच्यावर सीपीआर मध्ये तातडीने उपचार झाल्यामुळे त्यांच्या जीवाचा धोका टळला. शनिवारी महाजन यांना घरी पाठविण्यात आले. पाटील दांपत्याने दाखविलेली तत्परता आणि समय सूचकता यामुळे गंभीर जखमी झालेल्या ज्ञानदेव महाजन यांचे प्राण वाचल्याने महाजन आणि सुतार कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.