अगसगे ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
अगसगे गावातील रेशन दुकानामधून रेशन वितरण योग्यप्रकारे होत आहे. गेल्या 40 वर्षांपासून रेशन वितरण सुरळीत सुरू आहे. असे असताना रेशन वितरण केले नाही म्हणून संबंधित दुकानावर कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. ते थांबवावे, या मागणीसाठी अगसगे गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
अगसगे गावातील रेशन दुकान क्र. 96 मधून रेशन वितरण वेळेत केले जाते. मात्र, काही कारणास्तव मध्यंतरी दुकानातून वितरण झाले नाही. दुसरीकडे दुकान हलविल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. मात्र, आजपर्यंत योग्यप्रकारे वितरण सुरू आहे. रेशन दुकानातून धान्य वितरण झाले नाही म्हणून संबंधित दुकानावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, या दुकानामधून रेशनचे वितरण योग्यप्रकारे होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अगसगे येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.