दरवाजाची कडी कटावणीच्या साहाय्याने तोडून 200 किलो लोखंडी बार लांबविले
वार्ताहर /हलगा
बस्तवाड (हलगा) येथील प्राथमिक मराठी शाळेत समाजकंटकांकडून दुसऱयांदा धुडगूस घालण्यात आला आहे. दरवाजाची कडी तोडून 200 किलो लोखंडी बारही लांबविले. हा प्रकार मंगळवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनास आला असून सोमवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी शिक्षक शाळेत आल्यानंतर सदर प्रकार निदर्शनास आला. मुख्याध्यापक सतीश कदम यांना एसडीएमसीचे अध्यक्ष प्रकाश बांडगी यांनी फोन करून माहिती दिली. त्यानंतर एसडीएमसी सदस्य, कॉन्ट्रक्टर किरण जोझिन व गावातील प्रमुख पंचमंडळी शाळेत दाखल झाली.
चोरटय़ांनी शाळेच्या दरवाजाची कडी कटावणीच्या साहाय्याने तोडून शाळेत प्रवेश केला. कंपाऊंड बांधाकाम वापरासाठी ठेवलेल्या रिंग व जाळीचे बार असे एकूण 200 किलो लोखंड चोरटय़ांकडून लांबविण्यात आले.शाळेच्या पटांगणाजवळील इमारतीच्या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. तो कॅमेराही पुन्हा एकदा फोडला आहे. या घटनेची माहिती बागेवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी बागेवाडी पोलीस स्थानक व तसेच ग्रा. पं. पीडीओ श्वेता यांना घडलेल्या सर्वप्रकाराची माहिती देण्यात आली आहे. तसेच शाळा आवारात काही जण दारू पित आहेत. तसेच सिगारेट ओढून त्या ठिकाणी सिगारेटची पाकिटे टाकण्यात येत आहेत, अशी माहिती एसडीएमसी सदस्यांनी दिली.
आपल्या वाडवडिलांनी गावात मराठी शाळा, मराठी संस्कृती टिकावी यासाठी केलेले प्रयत्न, त्यांची पराकाष्टा याची जाणीव सध्याच्या तरुण पीढीला होणे गरजेचे आहे.
मागील वर्षीही तोडफोड
मागील वर्षी देखील 27 जुलै 2021 रोजी तोडफोड करून शाळेच्या रुममधील कपाटाची नासधूस करण्याचा प्रयत्न झाला होता. नेमके कोण व कशासाठी हा सर्व प्रकार करत आहेत? हे देखील शोधण्यासाठी गावकऱयांनी व माजी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन यामागचे कारण शोधण्यासाठी प्रयत्न करावेत, असे शिक्षक व एसडीएमसी अध्यक्षाकडून सांगण्यात आले.