मालमत्ता हडप करण्यासाठीच घर कामासाठी महिलेला पाठविले : तपासात धक्कादायक माहिती उघड
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटकातील प्रसिध्द सीनेगीतकार के. कल्याण यांच्या पत्नी, सासू, सासऱयाच्या अपहरण प्रकरणाला पोलीस तपासात धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. मालमत्ता हडप करण्यासाठीच मांत्रिकाने एका महिलेला कल्याण यांच्या घरी कामाला पाठविले होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. या दांपत्यांमध्ये भांडण लावून मांत्रिकाने 5 ते 6 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी सकाळी ही माहिती दिली आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकाऱयांनी गेले सहा दिवस शिवानंद बसवराज वाली (वय 38, रा. बुदिहाळ, ता. बिळगी, जि. बागलकोट) याला पोलीस कोठडीत घेवून या प्रकरणाचा तपास केला आहे.
पोलिसांनी 9 मॅक्सीकॅब, 350 ग्रॅम सोन्याचे दागिने, 6 किलो चांदी असे एकूण 1 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. शिवानंद या भोंदू मांत्रिकाने बेळगाव, बेंगळूर, हुबळी-धारवाड, अथणी, शिरहट्टी परिसरातील एकूण 5 ते 6 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी 2 मालमत्तंsवर त्याने आपले नाव चढवून घेतले आहे तर चार मालमत्तांचे जीपीए घेतले आहे.
गेल्या दहा दिवसांपूर्वी के. कल्याण यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. आपली पत्नी अश्विनी, सासू राधिका सात्विक, सासरे कृष्णा सात्विक यांचे अपहरण झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले होते. मांत्रिक शिवानंद वाली व घरकामासाठी म्हणून आलेल्या गंगा कुलकर्णी या महिलेविरुध्द अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेवर व त्यांच्या सहकाऱयांनी शिवानंदला अटक करुन तपास हाती घेतला असता कल्याण यांच्या सासु, सासऱयांच्या नावे असलेली मालमत्ता हडप करण्यासाठी या भोंदू मांत्रिकाने गंगा कुलकर्णीला घर कामानिमित्त बेंगळूर येथील त्यांच्या घरात घुसविले होते. कल्याण यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे, असे सांगत गंगा कुलकर्णीने कल्याण यांची पत्नी व सासु, सासऱयाचा विश्वास संपादन केला होता.
जीवीताला असलेला धोका दूर करण्यासाठी या मांत्रिकाने विचित्र मांत्रिक प्रयोगही केला आहे. एका प्रयोगासाठी दोन ते तीन लाखरुपये खर्च करण्यात आले आहेत. के. कल्याण यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून मांत्रिकाच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात आली आहे. या पैशातून मांत्रिकाने 10 मॅक्सीकॅब खरेदी केली होती. यापैकी 9 पोलिसांनी जप्त केले आहेत.
मॅक्सीकॅबच्या माध्यमातून त्याने प्रवासी वाहतूकही सुरु केली होती. या भोंदू मांत्रिकाने आजवर असे अनेक प्रकार केले आहेत. के. कल्याण यांच्या कुटुंबियांची मालमत्ता हडप केल्यानंतर शिवानंद कोटय़ाधीश झाला होता. आता ही मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी त्याला कायदेशीर लकडा लावला आहे. गंगा कुलकर्णीलाही लवकरच अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली.
7 ऑक्टोबर रोजी शिवानंद वालीला अटक झाली होती. त्यानंतर सहा दिवसांसाठी त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. सोमवारी कोठडीची मुदत संपल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्याला प्रथम न्यायदंडाधिकारी व्दितीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशावरुन त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.