प्रतिनिधी /बेळगाव
एसीबी (ऍन्टी करप्शन ब्युरो) उत्तर विभागाच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 (दुरुस्ती-2018) संबंधी येथील सुवर्ण विधानसौधमध्ये तीन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सोमवारी बेंगळूर कार्यालयातून एसीबीचे आयजीपी एम. चंद्रशेखर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यशाळेचे उद्घाटन केले.
बेळगाव येथील चतुर्थ अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजय एन. व्ही., राज्य माहिती आयोगाच्या बेळगावपीठाच्या आयुक्त गीता बी. व्ही., धारवाड येथील राज्य उच्च न्यायालयाचे विशेष सरकारी वकील मल्लिकार्जुन हिरेमठ आदी यावेळी उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर मल्लिकार्जुन हिरेमठ, ऍड. शंकर हेगडे, बेंगळूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश (लोकायुक्त विशेष न्यायालय) मंजुळा इट्टी आदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कार्यशाळेत मार्गदर्शन केले. एसीबी विभागाच्या उत्तर, पूर्व, पश्चिम, ईशान्य व बळ्ळारी विभागातील 200 हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांनी भाग घेतला होता. बेळगावचे एसीबी विभागाचे पोलीस अधिक्षक बी. एस. नेमगौडर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा सुरु आहे. 14 ऑक्टोबर रोजी त्याचा समारोप होणार आहे.