मानहानी होतील अशा वृत्तांचे प्रसारण करण्यास न्यायालयाची स्थगिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
आपल्या विरोधात कोणतेही मानहानी होईल असे वृत्त प्रसारीत करण्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी सहा प्रभावी मंत्र्यांनी शुक्रवारी दाखल केली होती. या याचिकांची बेंगळूरच्या सिटी सिव्हिल कोर्टाने दखल घेतली असून 30 मार्चपर्यंत संबंधीत मंत्र्यांची मानहानी होईल, असे वृत्त प्रसारण करण्यास प्रसिद्धी माध्यमांवर निर्बंध घातले आहेत.
पाठबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासंबंधी वादग्रस्त सीडीच्या मुद्दय़ावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर कामगार मंत्री शिवराम हेब्बार, कृषीमंत्री बी. सी. पाटील, सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर, क्रीडा मंत्री नारायणगौडा, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आणि नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांनी बेंगळूरच्या सिटी सिव्हिल कोर्टात धाव घेत आपली बदनामी होईल, अशा वृत्तांचे प्रसारण करण्यास स्थगिती द्यावी, अशी याचिका दाखल केली होती. न्या. बी. एस. विजयकुमार यांनी शनिवारी याचिकांवर सुनावणी करून सहा मंत्र्यांविषयी मानहानीकारक वृत्त प्रसारणाला स्थगिती दिली. यासंबंधी प्रसिद्धी माध्यमांना नोटीस बजावली आहे.