8 जखमी : 3 दिवसांत तिसरा ग्रेनेड हल्ला
वृत्तसंस्था/ त्राल
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ाच्या अवंतीपोरामध्ये त्राल बसस्थानकावर दहशतवाद्यांनी शनिवारी ग्रेनेड फेकला आहे. या हल्ल्यात 8 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. मागील 3 दिवसांमध्ये काश्मीर खोऱयातील हा तिसरा ग्रेनेड हल्ला आहे. या सर्व हल्ल्यांमध्ये एका सीआरपीएफ जवानासह 9 जण जखमी झाले आहेत.
त्राल बसस्थानकावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांना लक्ष्य करत हा ग्रेनेड फेकला होता. हा प्रकार सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास घडला आहे. दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड अन्यत्र पडून त्याचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे तेथील 8 नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
ग्रेनेड स्फोटानंतर बसस्थानकावर खळबळ उडाली, लोकांची आरडाओरड सुरू झाल्याने मिळालेल्या संधीचा लाभ घेत दहशतवादी तेथून फरार झाले आहेत. तर सुरक्षा दलांनी स्थानिकांची मदत घेत जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल पेले आहे. घटनेची माहिती मिळताच एसओजी, सैन्य आणि सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकडय़ांनी परिसराला घेरून दहशतवाद्यांचा शोध चालविला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या छनपोरा येथील एसएसबी तळानजीक ग्रेनेड हल्ला केला होता, परंतु यात कुठल्याच प्रकारचे नुकसान झाले नव्हते. तर गुरुवारी अनंतनाग येथील संगम भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्त पथकाला लक्ष्य करत युबीजीएल ग्रेनेड डागला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान जखमी झाला होता.