वृत्तसंस्था / ब्रिजटाऊन
रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱया टी-20 सामन्यात इंग्लंडने यजमान विंडीजवर केवळ एका धावेने थरारक विजय मिळवित पाच सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे. यजमान विंडीजने या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळविली होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 8 बाद 171 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे जेसन रॉयने 31 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह 45, मोईन अलीने 24 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31, जॉर्डनने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 27, बँटनने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डर आणि ऍलेन यांनी प्रत्येकी दोन तर कॉट्रेल, अकिल हुसेन, पोलार्ड आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजने 20 षटकांत 8 बाद 170 धावा जमविल्याने त्यांना हा सामना केवळ एका धावेने गमवावा लागला. विंडीजच्या डावात शेफर्डने 28 चेंडूत 5 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 44, अकील हुसेनने 16 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 44, पुरनने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, डरेन ब्रॅव्होने 20 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 23, ऍलेनने 11 चेंडूत 1 षटकारांसह 12 धावा जमविल्या. या सामन्यात विंडीजला विजयासाठी शेवटच्या षटकात 30 धावांची जरूरी होती. दरम्यान अकील हुसेनने या षटकात 3 षटकारांसह 28 धावा झोडपल्या पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देवू शकला नाही. विंडीजच्या डावात 13 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे आदिल रशीदने 24 धावांत 2, मोईन अलीने 24 धावांत 3, टॉप्ले आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड- 20 षटकांत 8 बाद 171 (रॉय 45, बँटन 25, मोईन अली 31, मॉर्गन 13, जॉर्डन 27, होल्डर 2-25, ऍलेन 2-50, कॉट्रेल, अकील हुसेन, पोलार्ड, शेफर्ड प्रत्येकी एक बळी), विंडीज- 20 षटकांत 8 बाद 170 (अकील हुसेन 16 चेंडूत नाबाद 44, शेफर्ड नाबाद 44, पुरन 24, डरेन ब्रॅव्हो 23, ऍलेन 12, मोईन अली 3-24, आदिल रशीद 2-24, टॉप्ले 1-18, जॉर्डन 1-39).