वृत्तसंस्था/ बेलफास्ट
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या मालिकेतील शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 49 धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बव्हुमाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
शनिवारच्या तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नवोदित खेळाडूंना अधिक संधी दिली होती. डि कॉक एन्गेडी आणि शम्सी यांना विश्रांती देण्यात आली होती.
या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 2 बाद 189 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर आयर्लंडने 20 षटकांत 9 बाद 140 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार बव्हुमा आणि हेन्रीक्स यांनी सलामीच्या गडय़ासाठी 15.2 षटकांत 127 धावांची भागिदारी केली. बव्हुमाने 51 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 72 तर हेन्रीक्सने 48 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 69 धावा जमविल्या. मिलरने 17 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 36 तर क्लासेनने 5 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 7 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे सिमी सिंग आणि मॅकर्थी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात एकाही फलंदाजांला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार बलबर्नाने 22 चेंडूत 4 चौकारांसह 27, यंगने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22, टकेरने 17 चेंडूत 2 चौकारांसह 19, मॅकर्थीने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 13, गेटकेटने 11, बॉल स्टर्लिंगने 14 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे लिन्डे, विल्यम्स, मुल्डेर यांनी प्रत्येकी 2 गडी तर फेहलुक्वायोने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक दक्षिण आफ्रिका -20 षटकांत 2 बाद 189 (बव्हुमा 72, हेन्रीक्स 69, मिलर नाबाद 36, क्लासेन नाबाद 7, सिमी सिंग 1-27, मॅकर्थी 1-40), आयर्लंड -20 षटकांत 9 बाद 140 (यंग नाबाद 22, बलबर्नी 27, स्टर्लिंग 18, टकेर 19, गेटकेट 11, मॅकर्थी नाबाद 13 लिन्डे 2-21, विल्यम्स 2-30, मुल्डेर 2-10, फेहलुक्वायो 1-15).