प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील राजेंद्रनगर रोडवरील साळोखे पार्कमधील उजेडात आलेले नोटरीव्दारे शाळकरी मुलग्याचे दत्तक प्रकरण चौकशीअंती अवैध असल्याचे उघड झाले. त्याचबरोबर या दत्तक प्रकरणी चौकशी करणार्या जिल्हा बाल संरक्षण समितीने संबंधीत मुलग्याचे वडील, दत्तक घेणारा तृत्तीयपथी, नोटरी करणारा वकील आणि संबंधीत मुलग्याच्या आईचे चुकीचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणार्या डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्याबाबतचे पत्र गुरुवारी पोलिसांना दिले. त्यावरुन पोलिसांनी यासर्व संबंधीताच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली गतीमान केल्या आहे
कोरोना महामारीमुळे हातचे काम गेले.
तसेच पत्नी मनोरुग्ण आणि वयोवृध्द आई-वडील आणि दोन मुलाचे संगोपन करता-करता नाकी नऊ येवू लागल्याचा बनाव करुन, दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील ( मुळ रा. काटे भोगाव, ता. पन्हाळा, सध्या रा. सावंतवाडा, गंगावेश, कोल्हापूर) या चांदी कारागिराने स्वत:चा दहा वर्षाच्या शाळकरी मुलग्याचा सांभाळ करता येईना, म्हणून गजेंद्र गुंडाळे (रा. साळोखे पार्क, राजेंद्रनगर रोड, कोल्हापूर) या तृत्तीयपथीला नोटरीव्दारे 29 मे रोजी दत्तक दिले होते. विशेष म्हणजे सर्वत्र लॉकडाऊन सुरु असताना हा दत्तक कार्यक्रम साळोखे पार्कमध्ये पार पडला होता. त्यानंतर हे दत्तक प्रकरण तब्बल चार महिन्यानंतर शनिवारी (19 सप्टेंबर) उघडकीस आले होते. तसेच या दत्तक प्रकरणामध्ये पाच लाखांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या प्रकरणाची जिल्हा बाल संरक्षण समितीने गांभीर्याने दखल घेवून, दत्तक दिलेल्या मुलाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केली.
चौकशीमध्ये हे संपूर्ण दत्तकपत्र अवैध असल्याचे जिल्हा बाल संरक्षण समितीच्या चौकशीत उघड झालेच. त्याचबरोबर या प्रकरणात संबंधीत मुलग्याचा वडील दिंगबर उर्फ उत्तम जोतीराम पाटील, तृत्तीयपथी गजेंद्र गुंडाळे आणि दत्तकपत्राचे रोटरी करणारा वकील, दिंगबर उर्फ उत्तम पाटील यांची पत्नी सुनिता पाटील हिचे वैद्यकिय प्रमाणपत्र देणारा डॉक्टर हे चार जण दोषी असल्याचे उघड झाले. त्यावरुन या चार जणाविरोधी गुन्हा दाखल करावा. असा अहवाल जिल्हा बाल संरक्षण समितीने गुरुवारी पोलिसांना पाठविला आहे. या अहवालाची गांभीर्याने दखल घेवून या चौघाविरोधी गुन्हे दाखल करण्याची पोलिसांनी हालचाली सुरु केल्या आहेत.