उचगावात रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबविले : शेतावर गेल्याची साधली संधी
वार्ताहर / उचगाव
उचगाव ऍप्रोच रस्त्यालगत असलेल्या राहत्या घरातील दरवाजाचे कुलूप दिवसाढवळय़ा तोडून चोरांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास 50 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. घरची मंडळी रात्री उशिरा घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीला आला.
उचगाव ऍप्रोच रस्त्यालगत गावाशेजारी कृष्णा जाधव यांचे राहते घर आहे. सकाळी घरातील सर्व मंडळी भाताच्या मळणीसाठी शेतावर गेली असताना दिवसाढवळय़ा चोरांनी घराच्या मागील बाजूचे कुलूप तोडून प्रवेश केला. तिजोरी फोडून साडेचार हजार रुपये रोख रक्कम तसेच झुब्बे व इतर वस्तू लांबविल्या.
सोन्याचे गंठण सुरक्षित
तिजोरीतील सोन्याचे दागिने लांबविण्यात चोर यशस्वी ठरले. मात्र, सोन्याचे गंठण इतरत्र ठेवले असल्याने ते चोरांच्या हाती लागले नाही.
सायंकाळी उशिरा घरची मंडळी शेतावरून परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीला आला. सदर कुटुंब गरीब असून झालेल्या चोरीने ते भयभीत झाले आहे. मात्र, चोरीची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली नसल्याचे समजते.