सातारा / प्रतिनिधी :
चिंचणेर वंदन, ता. सातारा येथे वाहन चालकासह अन्य दोघांना मारहाण करून दरोडा टाकत त्यांच्याकडून 9 हजार रुपये घेऊन फरार झालेल्या पाचजणांना अटक करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले.
अनिकेत रमेश वाघ, (वय 20), राज सतीश कदम ( 26), गौरव धनाजी बर्गे (22), अथर्व उर्फ मनोज सुरेश कदम, (19), निखिल सूर्यकांत बर्गे, (25, सर्व रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) अशी अटक केलेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.10 ऑगस्ट रोजी रात्री 12.10 वाजण्याच्या सातारा-रहिमतपूर मार्गे ऋषिकेश अनिल गोडसे, (रा. वडूज ता. खटाव) हा त्याचा भाऊ व अन्य एका सोबत पिकअप वाहन घेऊन वडूजकडे चालला होता. वाहन चिंचणेर वंदन गावच्या हद्दीत आल्यानंतर अज्ञात पाच ते सहा युवकांनी हुल्लडबाजी करत ते थांबवले. वाहन चालकाला खाली ओढून लाथाबुक्क्यांनी मारून त्याच्याकडून 9 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन ते पळून गेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस तपासादरम्यान दरोडा टाकणारे युवक हे चिंचणेर वंदन येथीलच असल्याचे समजले. संबंधित युवकांची पूर्ण माहिती काढून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.