प्रतिनिधी /पणजी
गोवा बोर्डाने दहावीच्या गणित आणि विज्ञान या दोन विषयांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटे जास्त वेळ देण्याचे ठरविले असून त्याची कार्यवाही दुसऱया सत्रात म्हणजे येत्या एप्रिलच्या परीक्षेत करण्यात येणार आहे.
गोवा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (गोवा बोर्ड) अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2021 मध्ये प्रथम सत्राची दहावीच्या परीक्षा झाल्यानंतर गणित, सायन्स या दोन विषयांसाठी जास्त वेळ देण्याची गरज अनेक शिक्षकांनी व्यक्त केली. गणित, विज्ञान हे दोन विषय इतर विषयांपेक्षा कठीण असतात. त्यामुळे या दोन विषयांसाठी जास्त वेळ देणे आवश्यक ठरते. गोवा मुख्याध्यापक संघटनेतर्फे जादा वेळ देण्याची सूचना आली होती परंतु प्रथम सत्रावेळी ती उशिराने आली व प्रत्यक्ष कार्यवाहीत आणणे शक्य झाले नाही म्हणून आता एप्रिल 2022 मधील दहावी परीक्षेत गणित, विज्ञान विषयासाठी 15 मिनिटे जास्त वेळ देण्यात येणार असल्याचे शेटये यांनी नमूद केले.