- प्रतिनिधी/ बेळगाव
- दहावीचे वर्ग सुरू होऊन आठवडय़ाचा कालावधी झाला आहे. मात्र अभ्यासक्रम कपातीबाबतचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. जून महिन्यात एसएसएलसीची परीक्षा होणार असून इ. 1 ली ते 9 वी वगळता दहावी अभ्यासक्रमात कपात करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र अजूनही याबाबतचे चित्र स्पष्ट नसल्याने नेमका कोणता अभ्यासक्रम वगळणार आणि कोणता अभ्यासक्रम पाठय़क्रमात राहणार याबाबत शिक्षक देखील अनभिज्ञ आहेत. यामुळे लवकरात लवकर अभ्यासक्रम कपातीबाबत निर्णय जाहीर करावा, अशी मागणी शिक्षकांमधून केली जात आहे.
- 2020-2021 या शैक्षणिक वर्षात प्रामुख्याने दहावीबाबत संभ्रमाची स्थिती होती. मात्र अखेर 1 जानेवारीपासून वर्ग सुरू करत परीक्षा जून महिन्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांसह, शिक्षक, पालकांकडून दहावीच्या वर्षाबाबत गांभीर्याने विचार केला जात असून लवकरात लवकर अभ्यासक्रम जाहीर करावा, असे मत व्यक्त होत आहे. शैक्षणिक वर्षाची कालमर्यादा विचारात घेता 50 टक्के कपात शक्य असून यावरच दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.