ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शनिवारी दैनंदिन रुग्णसंख्येने 1.50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत असून, मागील 10 दिवसात हा वेग दुप्पट झाला आहे. कारण 31 मार्चला 72 हजार असणारी दैनंदिन रुग्णसंख्या 4 एप्रिलनंतर लाखाचा आकडा पार करत कालपर्यंत दुप्पट झाली.
महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड बरोबरोबरच उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 15 दिवसात महाराष्ट्रात दीडपट, उत्तरप्रदेशात 9 तर बिहारमध्ये 10 पट रुग्ण वाढले आहेत. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहिला तर परिस्थिती चिंताजनक होऊ शकते.
दरम्यान, मागील 24 तासात 1 लाख 52 हजार 879 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 839 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 33 लाख 58 हजार 805 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 69 हजार 275 एवढी आहे.
शनिवारी 90,584 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 20 लाख 81 हजार 443 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 11 लाख 08 हजार 087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 10 कोटी 15 लाख 95 हजार 147 जणांना लसीकरण करण्यात आले.