प्रतिनिधी / दापोली
दापोली शहरातील फॅमिली माळ येथे रहाणाऱ्या खैरून मुकादम वय 50 या महिलेला 25 लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून 40 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
आपल्याला रोहित शर्मा, संदीप कुमार व आनंद कुमार व बँक मॅनेजर पटेल अशी नावे सांगणाऱ्या भामट्यांनी चाळीस हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार खैरून यांनी केली आहे.
फिर्यादी खैरून यांना त्यांच्या मोबाईलवर केबीसी कंपनीचा ऑफिसर बोलतोय, असे सांगणारा फोन आला फोनवरील इसमाने तुमचा मोबाईल नंबर लकी नंबर सिलेक्ट झाला आहे. तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले. त्यासाठी तुम्हाला २८ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून संबंधित आरोपीने त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र व बँक ऑफ इंडियाच्या खात्यात वेगवेगळी कारणे सांगून एकूण ४० हजार रुपये फिर्यादी कडून भरून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारचे बक्षीस न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांनी दापोली पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार अशोक गायकवाड हे करत आहेत.
पूर्वीदेखील दापोलीत असे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत. याच्या बातम्या देखील सोशल मीडिया व वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. तरी देखील जनता यापासून सावध न होता पुन्हा अशा प्रकारांमध्ये पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.