प्रतिनिधी / वास्को
श्री दामोदर भजनी सप्ताहाला रविवारी दुपारी प्रारंभ झाला. उद्योजक प्रशांत जोशी यांनी श्री दामोदर चरणी श्रीफळ ठेवून या सप्ताहाला विधिवत प्रारंभ केला. त्यानंतर मोजक्याच कलाकारांनी भजनाचे सूर आळवले. या प्रारंभनंतर पुढील चोवीस तासासाठी ध्वनीफितीवरून भजन सादर करण्यात आले. या भजनी सप्ताहाची सांगता आज दुपारी श्रीफळ विसर्जनाने होणार आहे.
श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच रविवारी दुपारी भजन सप्ताह उत्सव समितीचे सदस्य, भजनी कलाकार अशोक मनोहर मांद्रेकर (शिवोलकर), अनिल कोंडूरकर, सुर्या शेटय़े व जोशी कुटुंबीय अशा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. दरवर्षी हरि नामाच्या घोषाने भजन सप्ताहाला प्रारंभ करणाऱया अशोक मांद्रेकर यांनी भजनाचे सूर आळवून परंपरा राखली व त्यानंतरच्या भजन सादरीकरणासाठी ध्वनीफितीचा वापर करण्यात आला. अगदी शांत व सुरळीतपणे या भजनाची सुरवात झाली. मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत तसेच उद्योगपती नाना बांदेकर यांनीही देवदर्शन घेतले. आज दुपारी साधेपणाने भजन सप्ताहाची सांगता होणार आहे.
देवदर्शन बंदीच्या आवाहनाला भाविकांचा प्रतिसाद
कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा गर्दी टाळण्यासाठी देवदर्शनावर बंदी घातल्याने एरवी हजारोंच्या संख्येने देवदर्शनासाठी रांग लावणारे भाविक यंदा दिसले नाहीत. उत्सव समिती, समाजसेवक, शासकीय अधिकारी व इतरांनी भाविकांनी घरीच राहून दामोदराचे नामस्मरण करावे असे आवाहन गेले काही दिवस केले होते. त्या आवाहनाला भाविकांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. देवदर्शनासाठी दामोदराच्या सालाकडे फिरकण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. त्यामुळे मंदिरासमोरील वातावरण सुनसान होते. मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या पत्र्यांच्या कुंपणाबाहेर पोलीस बंदोबस्त होता.
साठ वर्षात प्रथमच स्वातंत्र्यपथ मार्ग झाला सुनासुना
मागच्या जवळपास साठ वर्षात वास्को शहरातील स्वातंत्र्य पथ मार्ग श्री दामोदर भजनी सप्ताहाच्या काळात केव्हाच सुनसान झाला नव्हता. मात्र, यंदा असा प्रसंग आला की भजन सप्ताहाच्या काळातही सारे वास्को शहरच सुनसान झाले. कोरोनाची झळ कमी व्हावी या हेतूने यंदाचा भजन सप्ताह गर्दी टाळणारा असा साजरा करावा लागला. हा उद्देश सफल करण्यासाठी भाविकांनीही मोलाची साथ दिली.
वास्कोतील भजन सप्ताह म्हणजे भजन, गायन, दिंडय़ा, पार आणि उत्साहाची मेजवानीच असायची. पं. भिमसेन जोशी, जितेंद्र अभिषेकी यांच्यासह कधी काळी संगीत क्षेत्रातील इतर पंडीत आणि दिग्गज कलाकारांनी या भजनी सप्ताहात वर्णी लावलेली आहे. अलिकडच्या काळातही पं. हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, प्रभाकर कारेकर, अजित कडकडे, देवकी पंडित अशा अनेक दिग्गजांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. या मैफलींच्या आठवणी स्थानिक श्रोत्यांच्या मनात घर करून राहणार आहेत. यंदाची ही परंपरा खंडित झालेली आहे. या सप्ताह उत्सवाचे दुसरे वैशिष्ठ म्हणजे शहरात भरणारी फेरी. आठ ते दहा दिवस ही फेरी भरायची. तिही यंदा खंडीत करावी लागली. शहरातील स्वातंत्र्य पथ भजनी सप्ताहाच्या काळात मागच्या पन्नास वर्षात कधीच सुनसान झाला नव्हता. आठ दिवस हा मार्ग गर्दी खेचत होता. रविवारी प्रथमच फेरी आणि भाविकांच्या अनुपस्थितीमुळे हा मार्ग सुनसान राहिला. याचा परिणाम पूर्ण वास्को शहरावर दिसून आला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुनसान वातारणात अधिकच भर पडली होती. इतिहासातील पहिल्या सुन्या भजनी सप्ताह उत्सवाची सांगता आज दुपारी होणार आहे.