दुबई : दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग गुरुवारी युएईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर लगोलग त्याच्या हॉटेलमधील 6 दिवसांच्या क्वारन्टाईनची सुरुवात झाली. यंदा 13 व्या आवृत्तीची आयपीएल स्पर्धा दि. 19 सप्टेंबरपासून खेळवली जाणार असून त्यासाठी सर्व संघ एव्हाना युएईमध्ये दाखल झाले आहेत.
हॉटेल रुममध्ये पोहोचल्यानंतर पाँटिंगने त्याचे छायाचित्र ट्वीट केले. दिल्ली कॅपिटल्सचे अन्य खेळाडू व सहायक पथकातील सदस्य दि. 23 ऑगस्टपूर्वीच येथे दाखल झाले आहेत.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियात असताना पाँटिंगने आपण अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला मंकडिगची परवानगी देणार नाही, असा फतवा काढला होता.
मागील हंगामात अश्विनने नॉन स्ट्रायकर एण्डवरील जोस बटलरला चेंडू टाकण्यापूर्वी धावचीत केले होते. ही मंकडिग पद्धत खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचा दावा पाँटिंगने केला आहे.