प्रतिनिधी /पणजी
दिवाडी बेटावरील सां मातियश पंचायत क्षेत्रातील अनड तेरे खाजन टेनंट असोसिएशनच्या बांधाला पडलेले भगदाड बांधून दिल्याबद्दल कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते राजेश फळदेसाई यांचे ऋण व्यक्त करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
व्यासपीठावर राजेश फळदेसाई, संघटनेचे अध्यक्ष मनोहर मोरजकर, गुरुदास मनोहर भोमकर, मालार पंचायतीचे पंच सदानंद शंकर फडते, बांधाचे कंत्राटदार गुरुदास गोपी भोमकर (बुराटो), शेतकरी संघटनेचे खजिनदार रोहिदास मांद्रेकर व गुरुदास नागेश भोमकर उपस्थित होते.
मनोहर मोरजकर यांनी बांधाचे भगदाड (खावटे) फळदेसाई यांनी स्वतःच्या पैशांनी बांधून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. गुरुदास मनोहर भोमकर यांनी दिवाडी गावात मंदिराचे काम, रस्ते सफाई, कोरोनाच्या काळात त्यांनी लोकांना मदत केल्याचे सांगितले. कंत्राटदार गुरुदास गोपी भोमकर म्हणाले की शेतकऱयांचे हे काम करण्याची संधी आपल्याला फळदेसाई यांनी दिली. बांधकामाच्यावेळी लोकांनीही सहकार्य केले. पहाटेपासून काम करुन आम्ही हे बांधकाम वेळेत पूर्ण केले. लोकांनी आज फळदेसाई यांचा सत्कार केल्याबद्दल आपल्याला खूप आनंद झाला. भविष्यात लोकांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सदानंद फडते यांचेही भाषण झाले.
राजेश फळदेसाई यांनी आपल्या भाषणात आपल्याला समाजकार्य करण्यास आवडत असून अजून खूप मोठी कामे करण्याची इच्छा आहे. लोकांना आपल्याकडून शक्य ती सर्व मदत होईल, असेही सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सत्यवान भोमकर यांनी केले.