राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजन
क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा भारती गोवातर्फे क्रीडा क्षेत्रात बहुमुल्य योगदान दिलेल्या गोव्यातील ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. फर्मागुडी फोंडा येथील जीव्हीएम उच्च माध्यमिकच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाला गोव्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी देण्यात येणारा जिवबादादा केरकर प्राप्त राष्ट्रीय व्हॉलीबॉल व ऍथलेटीक खेळाडू बिना वागळे मेरशी, निवृत्त एपीईओ, अखिल भारतीय मल्लखांब महामंडळ व गोवा मल्लखांब संघटनेचे सचिव नारायण कुराडे मडगांव, फुटबॉल खेळाडू अल्बर्ट पिन्हेरो फोंडा, राष्ट्रीय शरीरसौष्टवपटू,पंच व प्रशिक्षक पास्कोल नोरोन्हा लोटली, राष्ट्रीय फुटबॉल व ऍथलेटीक तसेच मास्टर ऍथलेटीक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेते मार्टीन पिरीस फोंडा, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक व जीएफडीसीचे सदस्य आग्नेल फोन्सेका फेंडा, रणजी खेळाडू, बीसीसीआयच्या लेव्हल 3 चे प्रशिक्षक व एमसीसी अकादमीचे प्रशिक्षक विनोद धामस्कर मडगांव, निवृत्त शारीरिक शिक्षक व गोवा जिमनेस्टीक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर नायकोजी फोंडा, आंतरराष्ट्रीय बीच व्हॉलीबॉल पंच व टेनिस टेनिस प्रशिक्षक जयवंत हमन्नावर फोंडा, निवृत्त शारीरिक शिक्षक व आंतरराष्ट्रीय मास्टर ऍथलेटीक स्पर्धेतील खेळाडू यशवंत शेट वेरेकर कुळे, वरिष्ठ मैदान पर्यवेक्षक, पीच क्युरेटर, राष्ट्रीय कबड्डी व हॅन्डबॉल खेळाडू राजेद्र आडपईकर मडगांव, क्रिकेट व बास्केटबॉल खेळाडू तसेच क्रीडा पत्रकार नरेश गावणेकर फोंडा, निवृत्त शारीरिक शिक्षक नवनाथ शिंदे ओल्ड-गोवा, देशी खेळांना चालना देणारे आंतरराष्ट्रीय लंगडी प्रशिक्षक व राष्ट्रीय कबड्डी पंच नारायण मराठे डिचोली यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याबरोबरच क्रीडा भारतीचे संस्थापक सचिव व गोवा बेसबॉल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिनानाथ उपाध्ये, क्रीडा भारती गोवाचे संस्थापक सदस्य व विद्यमान खजिनदार प्रभात शिकेरकर, गोवा जिमनेस्टीक संघटना, पॅरा जिमनेस्टीकचे अध्यक्ष, क्रीडा भारती गोवाचे सचिव सुदेश ठाकूर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धेत कास्य पदक मिळवलेल्या तसेच राष्ट्रीय जलतरण व तिरंदाजी स्पर्धेत पदके प्राप्त केलेल्या मंगेश कुर्टीकर यांचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष भास्कर खांडेपारकर, क्रीडा भारती गोवाचे अध्यक्ष कर्नल मंगेश दाणी व सल्लागार मिनानाथ उपाध्ये उपस्थित होते. यावेळी बोलताना भास्कर खांडेपारकर म्हणाले काही मुलांमध्ये उपजत गुण असतात ते हेरून त्यांना प्रशिक्षीत केल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके प्राप्त करू शकतील. काही प्रांतातील मुलांमधील शारीरिक ठेवणी ठराविक खेळासाठी उपयुक्त असते अशांना त्या खेळातील शास्त्रोक्त प्रशिक्षण व प्रायोजकांनी पाठबळ द्यायला हवे. शासन क्रीडा संस्था, क्रीडा तज्ञ व प्रायोजकांनी एकत्र होऊन काम केल्यास खेळाडू निश्चितच भरारी घेईल असे ते म्हणाले.
आपले मनोगत व्यक्त करताना नारायण कुराडे यांनी देशी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. मल्लखांब खेळाची सद्या चांगली प्रगती होत आहे. यासाठी सहकाऱयाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. अल्बर्ट पिनेरो म्हणाले खेळामुळे जीवन कौशल्य शिकायला मिळते. खेळात हार जीत पचविणे गरजेचे आहे. स्पर्धेसाठी कसे सक्षम असावे हे खेळ शिकवतो. ज्येष्ठ खेळाडूंनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे. बिना वागळे म्हणाल्या आपल्या यशात पालकांचा मोठा वाटा आहे. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळावे. घरातीलच कामे केल्यास आपला फिटनेस राहतो, एखाद्या संघाच्या विजयात सर्व सहकारी खेळाडू तसेच पाठिराख्यांचा सर्वात जास्त वाटा असतो. स्वागत कर्नल मंगेश दाणी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनु मोडक यांनी केले. संतोष प्रभूदेसाई यांनी आभार मानले.